
मेहकर, (प्रतिनिधी): शाळेला शिक्षक नसल्याने आमचे शिक्षण थांबले आहे.शिक्षकाची नियुक्ती करा,अशी मागणी करत तालुक्यातील मोहना खुर्द ( शेंदला) येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह आज १५ जानेवारी रोजी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना शिक्षक देण्याची मागणी केल्यानंतर सदर शाळेवर त्वरीत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी झाले.
मोहना खुर्द (ता.मेहकर) येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत एक शिक्षकी शाळा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुरता खेळखोळंबा झाला आहे. शिक्षण विभागाने १३ जानेवारी रोजी या शाळेवर एका शिक्षकाची नियुक्ती केली, परंतु सदर शिक्षक रुजुच झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आज १५ जानेवारी रोजी मेहकर येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यालयात जाऊन आपली आपबीती सांगितली. माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याशी बोलताना विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक मिळाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर संजय रायमुलकर यांनी गट विकास अधिकारी खरात यांच्याशी संपर्क साधून कुठल्याही परिस्थितीत सदर शाळेला त्वरित शिक्षक द्या, अशी सूचना केली. नंतर शालेय गणवेश व दप्तरासह आलेल्या विद्यार्थ्यांनी थेट गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला व नियुक्त केलेले शिक्षक रुजू झालेले नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला नवीन शिक्षक देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्र घेतला. गटशिक्षणाधिकारी वानखेडे यांनी शिक्षिका सावळे यांच्या नियुक्तीचा आदेश काढला व त्वरित सदर शाळेवर रुजू होण्याच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक संतोष ताकतोडे, सतीश चौरे, संतोष वायाळ,माधव वाघ, काशीराम चौरे, सतीश चौरे, रमेश भगवान चौरे, राजेंद्र सावंत, रमेश जंजाळ, शिवशंकर ताकतोडे, संतोष लाटे, बजरंग गोवर्धने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.



