क्राईम जगत

वृद्ध सासूला मारहाण; सुनेला तीन महिने कारावास

बुलढाणा न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

बुलढाणा,(प्रतिनिधी) : आजच्या मॉडर्न युगातील सुनांना पतीचे नातेवाईक घरात नकोसे वाटतात. नव्हेतर त्यांचा अनन्य छळ करतात. असेच कौटुंबिक वादातून स्वतःच्या सासूला आणि पतीला गंभीर मारहाण करणाऱ्या एका सुनेला बुलढाणा येथील न्यायालयाने दोषी ठरवत आज १५ जानेवारी रोजी तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
बुलढाणा शहरातील समर्थ नगर भागात आपल्या मुलासोबत वास्तव्यास असलेल्या कमल श्रीराम राठोड (वय ७९ वर्षे) यांचे २४ ऑगस्ट २०२३ रोजी घरात आपल्या सुनेसोबत किरकोळ कौटुंबिक वाद झाले होते. या वादातून त्यांची सून मिनल पंकज राठोड (वय ३२ वर्षे) हिने रागाच्या भरात आपल्या ७९ वर्षीय सासूला धक्का देऊन गंभीर दुखापत केली होती. मुलगा पंकज राठोड हा आपल्या आईला सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला असता, आरोपी मिनल हिने त्यालाही मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कमल राठोड यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून आरोपी मीनल हिच्या विरुद्ध गुन्हा क्र. ७६३/२०२३ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अंमलदार नामदेव खवले यांनी उपरोक्त गुन्ह्याचा अत्यंत तत्परतेने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बुलढाणा येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (न्यायालय क्र. २) यांचे समोर सदर खटला चालवण्यात आला न्यायाधीश पंकज देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. सरकारी वकिलांनी एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपी मिनल राठोड हिच्यावरील दोष सिद्ध झाल्याने
न्यायालयाने तिला तीन महिने साधा कारावास, एकूण ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये हे फिर्यादी कमल राठोड यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, तर उर्वरित एक रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले.
सरकारी पक्षाने मांडलेला युक्तिवाद आणि ६ महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षीमुळे या प्रकरणाचा निकाल लागण्यास मदत झाली. सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी अभियोक्ता ॲड.वैशाली कस्तुरे, स्वाती जयस्वाल आणि सचिन देशमुख यांनी काम पाहिले. तर पोलीस अंमलदार गजानन मांटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. दरम्यान, घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जात आहे. तर न्यायालयाने दिलेली ही शिक्षा अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी एक उदाहरण ठरेल, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!