
बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतूकदारांच्या नांग्या ठेचण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा शहरात विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीसह त्याच्या ताब्यात चारचाकी वाहन, असा एकूण ३ लाख ५६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.
अवैध दारू विक्रेता त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनात विदेश दारू घेऊन धाड नाका येथून सर्क्युलर रोडने चिंचोले चौकाकडे जात असल्याची गुप्त माहिती बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने चिंचोले चौकात सापळा लावला. समोरून येणारे चारचाकी वाहन थांबवून सचिन समाधान रिंढे (वय ३१ वर्षे) रा.शेलसूर ता.चिखली याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या (किंमत ५६ हजार ४१० रुपये) मिळून आल्या. पथकाने उपरोक्त दारूसह मारुती सुझुकी एस-प्रेसो (किंमत ३ लाख रुपये), असा एकूण ३ लाख ५६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा शहर पोलीस करत आहेत.
यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वात पोउपनि अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद, अनंता फरतळे, सुनील मिसाळ, महिला पोलीस अंमलदार आशा मोरे यांनी सदर कामगिरी बजावली.



