रोजगार

सुरक्षा रक्षकांसाठी “प्रहार” मैदानात

सुरक्षा रक्षकांसाठी “प्रहार” मैदानात
अन्यायकारक मैदानी चाचणी रद्द करण्याची मागणी; १९ जानेवारीपासून ‘अर्धनग्न’ आंदोलन
अमरावती,(प्रतिनिधी) : सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची घेण्यात आलेली अन्यायकारक मैदानी चाचणी आणि अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. तीन दिवसांत सुरक्षा रक्षकांच्या समस्यांची दखल न घेतल्यास १९ जानेवारी २०२६ पासून अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयासमोर ६३ सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबासह ‘अर्धनग्न व अर्धदफन’ आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी दिला आहे.
आपल्या आक्रमक आणि अभिनव आंदोलनासाठी प्रहार देशभरात परिचित आहे. सुरक्षा रक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रहारने रणशिंग फुंकले आहे. अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सन २०२२ पासून अनेक सुरक्षा रक्षकांच्या फाईल्स नोंदणीसाठी प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ४ डिसेंबर २०२५ रोजी नवीन शासकीय निर्णय नुसार सुरक्षा रक्षकांची मैदानी चाचणी घेण्यात आली. मात्र, ही चाचणी पोलिसांच्या भरती प्रक्रियेप्रमाणे कठीण घेण्यात आल्याने, त्यामध्ये ६३ अनुभवी सुरक्षा रक्षक अपात्र ठरले आहेत.
कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची शारीरिक क्षमता आणि कामाचे स्वरूप पाहता त्यांच्यावर पोलीस भरतीचे निकष लावणे चुकीचे आहे. नवीन शासन निर्णय रद्द करून या सुरक्षा रक्षकांची मैदानी चाचणी जुन्या नियमानुसारच घ्यावी, अशी मागणी कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे आणि विशाल दंडगव्हाळ (कामगार जिल्हाध्यक्ष, अकोला) यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. सोबतच शासनाने तीन दिवसांत मागणीचा सकारात्मक विचार न केल्यास १९ जानेवारी २०२६ पासून ६३ सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबासह आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे. आंदोलनादरम्यान जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद आहे. प्रहारने लढाईसाठी कंबर कसल्याने शासन यावर काय निर्णय घेते आणि १९ जानेवारीचे आंदोलन काय रंग भरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!