
मोताळा,(प्रतिनिधी): कोथळी शिवारात आज १७ जानेवारी रोजी फारुख शहा नावाच्या युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. फारुकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नसले, तरी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून हा अपघात आहे, की घातपात?, याबाबत स्पष्ट कारण अद्यापपर्यंत समोर आले नाही.

मुळचा अकोला (जि.अकोला) येथील रहिवासी असलेला फारुख शहा सलीम शहा हा गेल्या काही महिन्यांपासून कोथळी येथे आपल्या आजोबाकडे आलेला होता. या ठिकाणी त्याने शेती केलेली होती. १६ जानेवारी रोजी फारुक नातेवाईकाची जमानत घेण्यासाठी गेलो होते. कोर्टातील कामकाज संपल्यानंतर सायंकाळी ४ वाजताच्या दरम्याने ते कोथळीकडे जाण्यासाठी निघाले. तर फारुक नातेवाईकाला लोणघाट येथे सोडण्यासाठी जात असल्याने तो जयसिंगपुर फाट्याकडे त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एमएच-३९-बीयू-७२४६ ने निघुन गेला. उशीरापर्यंत फारुख घरी न परतल्याने त्याच्या वडीलांनी इस्लाम शहा यांना फोन करुन चौकशी केली. फारुख अजूनपर्यंत घरी पोहोचला नसून तो फोनही उचलत नसल्याचे त्यांना सांगितले. रात्री तीन वाजतापर्यंत त्याच्या कुटुंबियांनी फारुकची चौकशी केली. मात्र, त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, आज १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता जयपुर कोथळी रोडवर असलेल्या जुनना गावाजवळ एमएच-३९-बीयू-७२४६ क्रमांकाची मोटारसायकल पडलेली, तसेच मोटारसायकलच्या बाजूला फारुकचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे. फारुखचा मृत्यू अपघात नसून त्याचा घातपात करण्यात आल्याची शंका त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी सदर बाब गांभीर्याने घेत बारकाईने तपास सुरु केला आहे. फारुकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. फारुकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



