क्राईम जगत
खळबळजनक : “महसुल”च्या ताफ्यावर दरोडेखोरांचा हल्ला
हल्ल्यात वाहनांचे नुकसान; महिला कर्माची गंभीर जखमी

डोणगाव,(प्रतिनिधी) : बुलढाणा येथील महसूल क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर परतीच्या प्रवासात असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर अज्ञात दरोडेखोरांनी तुफान दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. तर तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आमखेड फाट्यापासून अवघ्या काही अंतरावर १६ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा मुख्यालयी म्हणजे बुलढाणा येथे १६ जानेवारी रोजी “महसूल क्रीडा स्पर्धा २०२६” अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या १३ तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बुलढाणा येथे गेले होते. दिवसभराच्या कार्यक्रमांची रेलचेल आपल्यानंतर रात्री उशिरा ११.३० च्या सुमारास मेहकर उपविभागातील काही अधिकारी व कर्मचारी आपापल्या वाहनांनी परतीच्या प्रवासात निघाले. रात्री ११ च्या सुमारास बुलढाणा-चिखली मार्गावरील आमखेड फाट्यापासून २ किलो मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन स्थळावरील वळणावर आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात दरोडेखोरांच्या टोळक्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू केली. एवढ्यावरच न थांबता रस्ता अडवून सदर वाहने थांबवण्याचा तसेच लूटमार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन चालकांसह महसूल कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आपली वाहने सुसाट वेगाने पुढे पळवली. त्यामुळे जीवितहानीसह मोठी लूट टळली. मात्र, दगडफेकीमुळे वाहनांच्या काचा फुटून एका महसूल सेवकाच्या डोळ्याला काचेचा तुकडा लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या गाड्यांचे झाले नुकसान
दरम्यान, या हल्ल्यात महसूल सेवक नितीन नवघरे यांच्या महिंद्रा बोलेरो क्रमांक एमएच-२८-व्ही-४८१० या वाहनाच्या समोरील आणि बाजूचे काच फुटून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अरुण साबळे यांच्या एमएच-२८-सीसी-३३४६ क्रमांकाच्या गाडीच्या रुफटॉपवर दगड लागल्याने त्यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या वाहनातून आरती साबळे आणि सविता भंडारे ह्या प्रवास करत होत्या. अनंत साळवे आणि अजयसिंह जोहरे यांच्या एमएच-२८-बीडब्ल्यू-९०९८ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर वाहनाचे बोनेट आणि दरवाजा दबल्याने २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी
रात्रीच्या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले दुर्दैवी आहे. मुख्य रस्त्यावर जर सरकारी अधिकारी सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवावी आणि लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे.



