संपादकीय
बुलढाण्यातील निष्पाप बालक अंधकारमय भविष्यात?
बालमजुरांची वाढती संख्या चिंताजनक; सामूहिक प्रयत्नांची गरज

बुलढाणा : शहरातच नव्हेतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालमजुरांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे अनेक निष्पाप बालकांना त्यांच्या बालपणीच्या हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. इतकेच नाही, तर धोकादायक परिस्थितीत काम काम करावे लागत असून या निष्पाप बालकांचे भविष्य अंधकारमय होत आहे.जिल्ह्यात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवणे सध्यातरी कठीण आहे.
जिल्ह्यातील विविध हॉटेल, व्यावसायिक प्रतिष्ठाने, बांधकाम स्थळे आणि घरगुती कामांमध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणात कष्ट उपासतांना दिसत आहेत. नव्हेतर त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. पुरेसा आहार, शिक्षण आणि खेळण्याची संधी न मिळाल्याने त्यांचे भविष्य अंधकारमय बनत चालले आहे. कमी वेतनावर जास्त तास काम करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत आहे. १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या कामावर ठेवणे, तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांना धोकादायक कामांमध्ये लावणे he देखील बालकामगार कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र, जिल्ह्यात सरेआम हा गुन्हा होत असताना कायद्याचे रक्षक मग गिळून बसले आहेत. बालमजुरी थांबविण्यासाठी केवळ कायदे बनवून उपयोग नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी सरकार आणि प्रशासनाने कठोर पाऊले उचलून या बालकांना शिक्षणाचा हक्क आणि सुरक्षित वातावरणात वावरण्याची संधी कशी मिळेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
बालमजुरीमुळे केवळ केवळ त्या बालकांचे भविष्य उद्ध्वस्त होत नाही, तर समाजावरही त्याचे नकारात्मक परिणाम होतात. सोबतच देशाच्या विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी बालमजुरीच्या विरोधात आवाज उठवून आणि प्रशासनाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करून दोषींवर कारवाई करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तसेच गरीब कुटुंबांना आर्थिक मदत आणि शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणेही तेवढेच आवश्यक आहे. यामुळे पालक आपल्या मुलांना कामावर पाठवण्यास मजबूर होणार नाहीत, हे तितकेच खरे!