
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धानोरा, विटाळी, काटी, माकनेर या गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी,अशी मागणी पंचायत समिती उपसभापती तथा महिला दक्षता समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी केली आहे.
धानोरा येथील एका नागरिकाच्या घरी काही महिन्यांपूर्वी दागिने व रोकड चोरीस गेल्याची घटना घडली होती. तसेच काटी गावातही काही दिवसांपूर्वी घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरीस गेली. चोरट्यांचा या परिसरात वावर वाढला असून या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा चोरट्यांचा संशयास्पद वावर दिसून आला आहे. सोबतच रात्रीच्या वेळी गावातील नागरिकांना जागून पहारा द्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे असून या परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात यावी, घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यावी, चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी आणि परिसरात भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी मागणी देखील योगिता गावंडे यांनी निवेदनाद्वारे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.



