मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडेंच्या अटकेविरुध्द देऊळगाव महीत उद्रेक
पोलिसांची कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणारी:सुनील मतकर

देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): धनगर समाजाला घटनात्मक हक्क असलेले आरक्षण तात्काळ लागू करावे, या न्याय्य मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. ही कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचे उदारण असल्याचा गंभीर आरोप देऊळगाव मही येथील धनगर समाज बांधवांनी केला आहे. या हुकूमशाही कारवाईिवरोधात संतप्त भावना व्यक्त करत समाजाच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लाखो धनगर समाज बांधव मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत होते. आंदोलन पूर्णत: शांततामय व लोकशाही मार्गाने होणार असताना शासनाने भीतीपोटी थेट अटक करून दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे ज्वलंत उदाहरण असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले. दीपक बोऱ्हाडे यांची अटक पूर्णपणे असंवैधानिक असून त्यांची तात्काळ व बिनशर्त सुटका करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा थेट इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, देऊळगाव मही ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पंडित, भगवान जोशी, अमोल गुरव, कैलास देढे, अभिजित शिंगणे, सतीश म्हस्के, कारभारी देढे, किशोर खंडागळे, योगेश खंडागळे, राजू बकाल, शंकर डोळझाके, अनिल वैद्य, विशाल शेळके, आदित्य चोपडे, विष्णू जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड,सचिन बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.



