क्राईम जगत

नांदुऱ्यात घरफोडी : सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास

नांदुरा,(प्रतिनिधी) : स्थानिक विरलक्ष्मीनगर येथील घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील लॉकर तोडून कपाटातील सोन्या-चादीचे दागिने व रोख रक्कम, असा एकुन दोन लाख ५ हजार ९७२ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक १६ जानेवारीच्या सकाळी ५ ते ५.४५ वाजे दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली आहे.
स्थानिक विरलक्ष्मीनगरमध्ये राहणारे अखीलेश प्रेमेंद्र अंधारे यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. १६ जानेवारी रोजी ते आपल्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत झोपले होते. सकाळी ५ वाजेनंतर त्यांच्या पत्नी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या. मॉर्निंग वॉकवरुन घरी परतल्यानंतर त्यांना दाराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरातील कपाटाचे लॉकरही तोडलेले दिसले. तसेच कपाटातील लॉकरमध्ये त्यांची आई अनिता अंधारे यांची सोन्याची एकदानी पोत (वजन अंदाजे १० ग्रॅम, किंमत ९ हजार रुपये), सोन्याचे डोरले असलेली पोत (वजन २ ग्रॅम, किंमत अंदाजे १८०० रुपये), एक चांदीचा आकडा (वजन १० ग्रॅम, किंमत ९०० रुपये), मावशी मोनिका क्षिरसागर (रा.मेहकर) यांच्याकडून तारण ठेवण्याकरीता आणलेला एक सोन्याचा तुकडा (वजन ७ ग्रॅम, किंमत ५४ हजार ६८५ रुपय), कानातील झुमके (वजन ४.४०० ग्रॅम, किंमत ३४ हजार ७३२ रुपये), कानातील वेल (वजन ५ ग्रॅम, किंमत ३९ हजार ५१४ रुपये), कानातील रिंग (वजन २.४०० ग्रॅम, किंमत ३३ हजार ९४१ रुपये), नाकातील दोन नथ (वजन १.५०० ग्रॅम, किंमत ९०० रुपये), सोन्याच्या मन्यांची पोथ (वजन ७ ग्रॅम, किंमत २१ हजार रुपये), असे १ लाख ९६ हजार ४७२ रुपयांचे दागिने, तसेच ९ हजार ५०० रुपये रोख, असा एकुण २ लाख ५ हजार ९७२ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी अखीलेश प्रेमेंद्र अंधारे यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३३१ (४), ३०५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनित घाटोळ हे करीत आहेत. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे चोरट्यांची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे नांदुरावासियांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!