क्राईम जगत
भोकरदन अवैध गर्भपात: मुख्य सूत्रधार जळगावमधून अटक
"एलसीबी"ने ४७ दिवसांनंतर डॉ.राजपूतला ठोकल्या बेड्या

भोकरदन,(प्रतिनिधी): भोकरदन (जि.जालना) येथील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंग राजपूत याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना अखेर यश आले. आरोपी डॉक्टर हा गेल्या दीड महिन्यांपासून म्हणजे ७ जुलै पासून पोलिसांना गुंगारा देत होता. राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला हादरवून सोडणाऱ्या या आरोपीला तब्बल ४७ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जळगाव जिल्ह्यातील पळसखेडा मिराचे ताब्यात घेतले आहे.
भोकरदन (जि.जालना) शहरात अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याच्या माहितीवरुण ७ जुलै २०२४ रोजी आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे या केंद्रावर छापा मारला होता. या छाप्यामुळे जालना जिल्ह्यातच नव्हेतर राज्यभरात खळबळ माजली होती. पोलीस आणि आरोग्य अधिकारी इमारतीत शिरल्याचे बघून हे केंद्र चालवणारा मुख्य आरोपी डॉ. दिलीपसिंग राजपूत हा इमारतीवरून उडी मारून पसार झाला होता. तेव्हापासून पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.
डॉ.राजपूत हा वारंवार ठावठिकाणा बदलून पोलिसांना चकवा देत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. दरम्यान, जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना डॉ. राजपूत जळगाव जिल्ह्यातील नेरीजवळ असलेल्या पळसखेडा मिराचे येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि योगेश उबाळे, कर्मचारी शामल कांबळे, कृष्णा तंगे, धीरज भोसले, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर आणि योगेश सहाणे यांच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी सापळा रचून डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १५ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. डॉ. राजपूतच्या अटकेपूर्वी पोलिसांनी अटक केलेले चार जणांची रवानगी सध्या जिल्हा कारागृहात करण्यात आलेली आहे. या टोळीचे जाळे मोठे असून अजूनही १० आरोपी फरार असल्याची माहिती असून सदर आरोपी कोण?, या अवैध गर्भपात केंद्रामध्ये कोणकोणते एजंट सक्रिय होते, सोनोग्राफी मशीनचा वापर कसा केला जात होता आणि या गैरकृत्यात आणखी कोणत्या डॉक्टरांचा समावेश आहे का, याचा खुलासा आरोपी डॉ. राजपूतच्या चौकशीतून होण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे अवैध गर्भपात करणाऱ्या आणि स्त्रीभ्रूणहत्येला प्रोत्साहन देणाऱ्या गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.



