महाराष्ट्र माझा

खळबळजनक: मलकापूरच्या नाकाबंदीत ४६.७८ लाखांची रोकड जप्त!

धाडच्या सलीम खान नईम खानच्या ताब्यातूनही २६ लाख जप्त; मध्य प्रदेशातून येत होता पैसा

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): स्थानिक तहसील चौक परिसरात मलकापूर शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत एका पाठोपाठ एक, अशा दोन आलिशान कारमधील थोडे थोडके नव्हेतर तब्बल ४६ लाख ७८ हजार ८५० रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. मलकापूर ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश गिरोसे यांच्या नेतृत्वाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून अवैध रकमांची ने-आण करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यामध्ये धाड येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा देखील समावेश आहे.
मलकापूर शहर पोलिसांच्या वतीने १७ जानेवारीच्या रात्री ११ ते १८ जानेवारीच्या पहाटे १ वाजतापर्यंत स्थानिक तहसील चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी खंडवा (मध्य प्रदेश) येथून देऊळगाव राजाकडे जाणारी होंडा वेन्यू कार क्रमांक एमएच-२१-बीव्ही-३३७८ पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली. वाहन मालक जगदीश ताराचंद गिरणीवाले (वय ५८ वर्षे) रा. देऊळगाव राजा यांची विचारपूस करून वाहनाची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीमध्ये नोटांनी भरलेली बॅग आढळली. यामध्ये ५०० च्या २४०० नोटा (१२ लाख), २०० च्या २००० नोटा (४ लाख), १०० च्या ४००० नोटा (४ लाख), असे एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर खंडव्याहून धाडकडे जाणारी किआ सोनेट कार क्रमांक एमएच-२१-बीक्यू-८४७४ थांबवुन चालक सलीम खान नईम खान (वय ४१ वर्षे) रा. धाड यांच्या गाडीची तपासणी केली असता, त्याच्या डिक्कीत २०० च्या ११,००० नोटा (२२ लाख),  १०० च्या ४,४०८ नोटा (४,४०,८००), ५०० आणि ५० रुपयांच्या नोटांसह एकूण २६ लाख ७८ हजार ८५० रुपयांची रोकड मिळून आली.
पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड कुठून आली आणि ती कुठे नेली जात होती?, याचा कसून शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे उपरोक्त पैशांबाबत कोणताही ठोस पुरावा संबंधितांना देता आला नसल्याने सदर रक्कम बेकायदेशीर कामासाठी वापरली जाणार होती का?, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेडगे, पोलीस अंमलदार तायडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!