स्मार्ट बुलढाणा
मलकापूरमध्ये अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला चिरडले
राष्ट्रीय महामार्गावरील थरारक घटना; अपघातानंतर चालक पसार

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नागपूरहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ जानेवारीच्या सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मलकापूर शहराजवळ घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मलकापूर शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणारे अनिल एकनाथ मालाठाणे (वय ४५ वर्षे) हे एका खासगी कंपनीत कार्यरत होते. सायंकाळी ते कामावरून घरी परतले. फ्रेश झाल्यानंतर जमिनीत ते पुन्हा बाहेर पडले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ओलांडत असताना त्यांना नागपूरहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती, की मालाणे हे १५ ते २० फूट हवेत उडून पुन्हा रस्त्यावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि घटनास्थावळच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, ही घटना महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. काही नागरिकांनी दुसऱ्या टोलनाक्यावर वाहनांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावामुळे परिचित असलेल्या मालाठाणे यांच्या अकाली निधनाने लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



