स्मार्ट बुलढाणा

अंजनीच्या लेकींचा एल्गार: घाटबोरी ते मेहकर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प

डोणगाव ,(प्रतिनिधी): एक तर बस वेळेवर येत नाही, आलीच तर चालक बस थांबवत नसल्याच्या एसटी प्रशासनाच्या आडमुठेपणाविरुद्ध १९ जानेवारी रोजी अंजनी बुद्रूक येथील शेकडो विद्यार्थिनींनी चक्क रस्त्यावर उतरून “रास्तारोको” आंदोलन केले. नव्हेतर “शिक्षण आमचा हक्क आहे, भीक नाही!”, अशा घोषणा देत एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध करत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थिनींच्या आक्रमक पवित्र्यामुळे महामंडळाने अखेर नमते घेत तातडीने जादा बसची व्यवस्था केली.

अंजनी बुद्रूक, अकोला ठाकरे आणि हिवरा साबळे या गावांतील शेकडो विद्यार्थी मेहकर (ता.मेहकर) येथे दररोज शिक्षणासाठी येतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावरील विद्यार्थिनींच्या हक्काची एसटी बस बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत होते. गाव फाट्यापासून एक किलोमीटर दूरवर असल्याने त्यांना दररोज पायपीट करावी लागते. सध्या हिवाळा सुरू असल्याने कडाक्याची थंडी, तसेच पावसाळ्यातही त्यांना भर पावसात पायपीट करावी लागली. घाटबोरी-मेहकर आणि लोणी गवळी-मेहकर या दोन्ही बस तिकडूनच प्रवाशांनी गच्च भरून येत असल्याने चालक आणि वाहकांनी अंजनीच्या थांब्यावर बस थांबवण्याचे सौजन्य कधीच दाखवले नाही. बसच्या प्रतीक्षेत थांबूनही बस काही थांबत नसल्याने शाळा बुडून शैक्षणिक नुकसान होत असल्याने अखेर १९ जानेवारी रोजी विद्यार्थिनींच्या संयमाचा बांध फुटला.
सकाळी नेहमीप्रमाणे या विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करत उभ्या होत्या. मात्र, बस न थांबल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या पालकांनी थेट रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडला. “बस नाही, तर रस्ता नाही” असा पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे घाटबोरी ते मेहकर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
विद्यार्थिनींच्या आक्रमक पावित्र्यासमोर पोलीस प्रशासनही हतबल झाले. बसची व्यवस्था होणार नाही, तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका विद्यार्थिनींनी घेतली. या गोंधळानंतर मेहकर आगाराने तातडीने हालचाल करत दुसरी बस पाठवल्याने आंदोलन शांत झाले. मात्र, आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी बसेसची संख्या कमी आहे, त्यामुळे नवीन बस देता येणार नाही, असे सांगत चालक-वाहक बस थांबवत नसतील तर तक्रार करा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन देत विद्यार्थिनींच्या जखमेवर मीठ चोळले.
आंदोलनाची वेळ येणे ही शोकांतिका
गाव-खेड्यातील मुलींनी शिकावे म्हणून सरकार करोडो रुपये खर्ची घालून “बेटी बचाओ, बेटी पढाओ” च्या घोषणा देत आहे. तर दुसरीकडे याच मुलींना शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!