स्मार्ट बुलढाणा
बुलढाणा फ्लॅश: “अक्षय वटवृक्ष” स्मारक संवर्धनासाठी आझाद हिंदचे पालिकेत “लोटांगण आंदोलन”
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनालाच अर्पण केला हार; कारवाई न झाल्यास "रास्ता रोको"चा इशारा

बुलढाणा,(प्रतिनिधी): “भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष” परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज २० जानेवारी रोजी आझाद हिंद संघटनेच्या वतीने बुलढाणा नगरपालिकेत लोटांगण आंदोलन करण्यात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनावेळी मुख्याधिकारी अनुउपस्थित असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंद दालनालाच हार घातला. तसेच मागण्यांचे निवेदन चिकटवून प्रशासनाचा निषेध केला.

स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतींचे प्रतीक असलेल्या “अक्षय वटवृक्ष” तथा ऐतिहासिक स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात १५ ऑगस्ट १९४७ रोजी हा “भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष” लावण्यात आला होता. तेव्हापासून हे स्मारक केवळ एक झाड नाहीतर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे जिवंत प्रतीक ठरले आहे. मात्र, सध्या या स्मारकाला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने वेढा घातला असून स्मारकाचे पावित्र्य धोक्यात सापडले आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आझाद हिंद संघटनेच्या वतीने करण्यात आला असून सदर स्मारक अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात आझाद हिंद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज २० जानेवारी रोजी थेट नगरपालिका गाठत त्या ठिकाणी जमिनीवर लोटांगण घालत आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलक जेव्हा त्यांच्या कक्षात पोहोचले, तेव्हा मुख्याधिकारी गैरहजर दिसले. त्यामुळे आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या बंद दालनाला हार घालून निवेदन चिटकवले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचे दिसून आले.

अन्यथा रास्ता रोको
येत्या ४८ तासांत अक्षय वटवृक्ष परिसरातील अतिक्रमण काढले नाही, तर आझाद हिंद संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील आझाद हिंद संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.



