स्मार्ट बुलढाणा

बुलढाण्याच्या मिर्झा नगरमध्ये घुसला बिबट्या!

वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा

बुलढाणा,(प्रतिनिधी): शिकारीच्या शोधत असलेल्या बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात दस्तक दिली आहे. नुकताच हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून बिबट्याचा वावर वाढल्याने मिर्झानगरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाच्या वतीने स्थानिक रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील मिर्झानगर आणि त्या लगतचा परिसर आधीपासूनच घनदाट जंगलाने वेढलेला आहे. विशेष म्हणजे या जंगलात बिबट्यांसह अनेक हिंस्त्र प्राण्यांचे पूर्वीपासून वास्तव्य आहे. शहरातील मोकाट कुत्रे आणि डुकरांच्या शिकारीसाठी या बिबट्याने आता मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. यापूर्वी देखील बिबट्याने पाळीव कुत्र्यांची शिकार केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या मिर्झानगरच्या गल्लीबोळांत फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. जंगलातील बिबट्या थेट मानवी वस्तीत आणि तेही घरांच्या दरवाजापर्यंत येत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणारे, तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे सावट निर्वाण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री उशिरा घराबाहेर पडणे बंद केले असून लहानग्यांचेही घराबाहेर खेळणे बंद झाले आहे
वनविभागाकडून खबरदारीच्या सूचना
बिबट्याचा वाढलेला वावर लक्षात घेऊन वनविभागाने या भागात गस्त वाढवली आहे. सोबतच रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, घराच्या परिसरातील पथदिवे सुरू ठेवावेत, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, परिसरात कचरा टाकू नये, डुकरे किंवा कुत्रे तिथे जमा होणार नाहीत,याची दक्षता घ्यावी, बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!