
छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): एका तरुणीच्या वादातून दोन कुख्यात गुन्हेगार शुभम जाट आणि अजय कागडा यांच्या टोळ्या आमने-सामने येऊन झालेल्या वादातूज बेछूट गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरस्थित मुकुंदवाडीतील शिवशाहीनगर परिसरात घडली.भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी मुख्य सूत्रधार शुभम जाट याला बेड्या ठोकल्या.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला कुख्यात गुन्हेगार शुभम जाट आणि अजय कागडा यांच्यात एका तरुणीवरून गेल्या काही महिन्यांपासून वाद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच वादातून अजयने शुभमला मारहाण केली होती. झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शुभम चांगलाच चवताळला होता. दरम्यान, अजय शिवशाहीनगरमधील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसलेला असल्याची माहिती शुभमला मिळाली.१९ जानेवारी रोजी आपल्या ७ साथीदारांसह शुभमने अजयचे नातेवाईक लाहोट यांच्या घरावर हातात नांग्या तलवार आणि गावठी कट्टा घेऊन जोरदार हल्ला चढवला. अजयला शिवीगाळ करत घराबाहेर बाहेर येण्याचे आव्हान दिले. मात्र, तो घराबाहेर न आल्याने संतप्त झालेल्या शुभमने गावठी पिस्तुलातून घरावर बुलेटचे दोन राऊंड फायर केले.तिसरी बुलेट फायर करत असताना त्याचा कट्टा लॉक झाला. त्यामुळे जीवितहानी टळली. काही काळ दहशत माजवून हल्लेखोरांनी परिसरातून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळ गाठले. गुप्त माहिती, तसेच तांत्रिक तपासावरून बीड बायपास परिसरातील म्हस्के पेट्रोल पंपामागे असलेले शुभमचे घर घेतले. पोलीस आल्याचे बघून शुभम व त्याच्या साथीदारांनी गच्चीवरून उड्या मारून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी झडप घालून सहा जणांना पकडण्यात यश मिळवले. शुभमची आई, आणि बहिणीने शुभमला वाचवण्यासाठी पोलिसां lसोबत वाद घातला. तसेच पोलिसांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्यांच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी घराची झाडाझडती घेऊन गच्चीवरील पाण्याच्या टाकीत दडून बसलेल्या शुभमच्या मुसक्या आवळल्या. तर मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय धनई, मनोज पडूळ, सागर राऊत आणि अमर उर्फ अतुल पवार यालाही बेड्या ठोकल्या आहेत. शहराची शांतता भंग करणाऱ्या टोळ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
“सोशल मीडिया”वर धमकी देऊन हल्ला
दरम्यान, शुभम जाट हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध २०१३ पासून विविध स्वरूपाचे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. १९ जानेवारीच्या हल्ल्यापूर्वी त्याने “गेम करणार”अशी स्टोरी सोशल मीडियावर ठेवली होती, हे विशेष!



