
खामगाव,(प्रतिनिधी): पारखेड फाटा परिसरात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या नाकाबंदीत २ लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. बलेनो कारमधून गुटख्याची चोरी छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी कारसह गुटखा जप्त करून दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूरकडून खामगावकडे येणाऱ्या एमएच-२८-बीक्यू-६५७० क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पाटील यांच्या आदेशानुसार २० जानेवारी रोजी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पारखेड फाटा येथे पथकाने नाकाबंदी केली. त्यावेळी संशयित सिल्व्हर रंगाची बलेनो कार आढळून आली. पथकाने सदर कार थांबवून चालकाची चौकशी केली असता, त्याने आपले नाव दिनेश मनवरलाल नथ्थाणी (वय ४२ वर्षे) रा. सिंधी कॉलनी, झुलेलाल नगर, खामगाव तर सोबत बसलेल्या इसमाने तेजस दिलीप झांबड (वय ४३ वर्षे) रा. अनिकट रोड, खामगाव) असल्याचे सांगितले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या पाच व पांढऱ्या रंगाचे ५ असे, १० पोते आढळून आले. त्यामध्ये असलेला २ लाख ३४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल तसेच ५ लाख रुपये किमतीची बलेनो कार असा एकूण ७ लाख ३४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसआय सुनील राऊत, पोलीस अंमलदार सुधाकर थोरात, योगेश कुँवारे, विनोद तायडे, विशाल कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



