स्मार्ट बुलढाणा
बुलढाणा:धार्मिक स्थळ परिसरात अश्लील चाळे करतांना पकडले
"प्रेमी युगल"ची प्रभाकर वाघमारेंनी जिरवली मस्ती;"शिवसेना स्टाईल"ने धडा शिकवू: देवांगणा अमित ठाकरे

बुलढाणा,(प्रतिनिधी): धार्मिक स्थळांचे पावित्र्य पायदळी तुडवू पाहत अशा ठिकाणी अश्लील प्रदर्शन करणाऱ्या एका टवाळखोर प्रेमी युगुलाला माजी छेडछाड विरोधी पथकाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांनी चांगलाच इंगा दाखवला. शहरातील एका प्रसिद्ध मंदिर परिसरात एक तरुण आणि तरुणी तोंडाला स्कार्फ आणि मास्क लावून अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत वावरत असताना बघून वाघमारेंनी या जोडीची चांगलीच खरडपट्टी काढली. १९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नव्हेतर आजकालच्या पिढीला नीतिमत्ता आणि संस्कारांचा विसर पडला की काय, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरातील एका प्रभागात असलेले हे मंदिर शहरात तसेच शराबाहेरही प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. १९ जानेवारीच्या दुपारी चेहरा झाकलेलं एक गुगल या मंदिर परीसरात आले. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची पर्वा न करता, हे दोघे जसे काही हनिमूनला आले आहेत, अशा थाटात अश्लील अंगविक्षेप करत फोटो काढण्यात मग्न होते. मंदिराच्या शांत आणि पवित्र वातावरणात सुरू असलेला हा ‘बेशरमपणा’ पाहून उपस्थित ज्येष्ठ नागरिक संतापले. त्यांनी तात्काळ ही बाब माजी छेडछाड विरोधी पथकाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांच्या कानावर घातली. प्रभाकर वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या जोडीला शांततेत तिथून निघून जाण्यास सांगितले आणि हे मंदिर असल्याचे भान राखण्यास बजावले. मात्र, संस्कारांची चाड नसलेली ती तरुणी चक्क वाघमारेंच्या अंगावर धावून गेली. “हे आमचे पर्सनल मॅटर आहे, तुम्ही बोलणारे कोण?” असा उद्धट प्रश्न केला. तरुणीचे हे उत्तर ऐकताच वाघमारेंचा पारा चढला आणि त्यांनी भररस्त्यात त्या जोडीला खडेबोल सुनावले. “जर हे तुमचे वैयक्तिक प्रकरण आहे, तर तुमचा नंगा नाच तुमच्या घरात किंवा तुझ्या प्रियकराच्या घरात जाऊन कर. मंदिराच्या परिसरात घाण कशाला करता? इथे लोक श्रद्धेने येतात, तुमच्या सारख्यांच्या स्वैराचारासाठी हे ठिकाण नाही,” अशा तिखट शब्दांत त्यांनी तिला खडसावले. तोंडाला स्कार्फ बांधून आडोशाला जाऊन जे नाही ते उद्योग करता, आई-वडिलांच्या कष्टाची आणि इज्जतीची राखरांगोळी करता. पण उद्या जेव्हा याच प्रियकरासोबत तुझे बिनसेल, तेव्हा कोणत्या तोंडाने पोलीस स्टेशनला जाशील? माझ्यावर अत्याचार झाला, मला फसवले, असे रिपोर्ट द्यायला तेव्हा स्वाभिमानाचे काय करशील?,हे शब्द कानावर पडताच बोलती बंद झालेल्या युगालांनी तिथून पळ काढला.
नात्याच्या नावाखाली स्वैराचार

आजची परिस्थिती पाहिली तर दररोज वर्तमानपत्र उघडले की मुलींचे पलायन, प्रेम प्रकरणातून होणारी फसवणूक आणि छेडखानीच्या बातम्यांनी पाने भरलेली असतात. ही तरुण पिढी पडक्या इमारती, सार्वजनिक बागा, धार्मिक स्थळे आणि काही ठराविक नेट कॅफे यांचा आधार घेऊन नात्याच्या नावाखाली स्वैराचार करत आहे. आई-वडिलांनी मोठ्या आशेने वाढवलेल्या या मुला-मुलींना आपल्या मर्यादांचे भान राहिले नसल्याची प्रतिक्रिया वाघमारे यांनी “हिंदवार्ता” बोलताना दिली.
‘शिवसेना स्टाईल’ धडा शिकवू

नवनिर्वाचित नगरसेविका देवांगणा अमित ठाकरे यांनी घटनेची गंभीर दखल घेत मंदिराचे पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यापुढे कोणत्याही मंदिर परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी जर कोणी असे अश्लील चाळे केले, तर त्यांची गय केली जाणार नाही. कायद्याचा धाक न मानणाऱ्यांना आता “शिवसेना स्टाईल”ने उत्तर देण्यासाठी आमची टीम सज्ज असल्याची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका देवांगणा अमित ठाकरे यांनी दिली.



