क्राईम जगत
वाळूचे तीन टिप्पर पकडले; एसडीपीओ खाडेंच्या पथकाची कारवाई
९१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; मेहकर व जानेफळ पोलिसांत गुन्हा दाखल

मेहकर,(प्रतिनिधी): अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात बुलढाणा पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारी तीन टिपर्स पकडली. या कारवाईत तब्बल ९१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी खाडे यांच्या पथकाने २० जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.१० वाजता दरम्यान मेहकर ते जानेफळ रोडवरील फर्दापूर शिवार नाकाबंदी केली. त्यावेळी पोलिसांनी दोन टाटा कंपनीचे टिपर्स (क्र. MH 28 BB 9109 आणि MH 28 BB 9181) अडवले. या वाहनांमधून अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता,त्यांच्याकडे कोणतेच कागदपत्रे मिळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही टिप्पर आणि रेती जप्त केली. या कारवाईत ५० लाख रुपये किमतीचे दोन टिपर्स, ८४ हजार रुपयांची वाळू आणि २० हजार रुपये किमतीचे चार मोबाइल, असा एकूण ५१ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी मेहकर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ४९ आणि खाण व खनिज अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी जानेफळ रोडवर बनावट परवान्याचा पर्दाफाश केला. जानेफळ ते मेहकर रोडवरील गोमेधर शिवार परिसरात पोलिसांनी एक संशयास्पद टिप्पर (क्र. MH 28 BY 5979) पकडले. तपासादरम्यान शासनाने दिलेल्या मूळ परवान्यामध्ये पेनने खाडाखोड करून बनावटगिरी केल्याचे निष्पन्न झाले. नव्हेतर शासनाची फसवणूक करून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची बाब समोर आली. या कारवाईत ४० लाख रुपयांचा टिप्पर आणि ४२ हजार रुपयांची वाळू, असा एकूण ४० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी जानेफळ पोलिसांत फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली.



