क्राईम जगत

बदलापूर पुन्हा हादरले: ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

राज्यभरात संतापाची लाट; चालक आरोपीला अटक

मुंबई,(प्रतिनिधी) : अवघ्या ४ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर नराधम स्कूल व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. सांस्कृतिक शहराला पुन्हा एकदा काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. एका नामांकित शाळेत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या अत्याचाराच्या घटनेची शाही वाळते, न वाळते तोच, पुन्हा तसाच प्रकार घडल्याने पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
४ वर्षांची पीडित चिमुकली ही दररोज स्कूल व्हॅनने शाळेत जात असे. नेहमीप्रमाणे व्हॅन चालक तिला शाळेत नेण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, प्रवासादरम्यान आरोपीने तिला निर्जन स्थळी घेऊन जात स्कूल व्हॅनमध्येच तिच्यासोबत संतापजनक कृत्य केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने चिमुकलीला मारहाण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकार लक्षात येताच पालकांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बदलापूर पोलिसांनी आरोपी स्कूल व्हॅन चालकाला अटक केली आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती शहरात पसरताच बदलापूर पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. नव्हेतर नागरिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात उभी असलेल्या स्कूल व्हॅनवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता चेंदवणकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या यावेळी आक्रमक झाल्याचे दिसून आले. आरोपीस पोलीस स्टेशनमध्ये आणताच संगीता चेंदवणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्हॅनवर दगडफेक करत तिची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात तणाव निर्माण झाला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले असून या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, सर्व स्कूल व्हॅन्स आणि खाजगी वाहनांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी देण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियापासून ते रस्त्यापर्यंत केल्या जात आहे. त्यामुळे सदर प्रकरण राज्याच्या राजकारणातही गाजण्याची शक्यता दिसून येत आहे.
ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह
बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यावेळी शासनाने शाळा तसेच स्कूल व्हॅनसाठी कडक नियमावली जाहीर करत व्हॅनमध्ये महिला मदतनीस असणे अनिवार्य केले होते. तसेच चालकाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक केले होते. मात्र, या घटनेने प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
मरणाचेही भय उरले नाही?
पोलिसांनी “त्या” प्रकरणानंतर हैदराबादच्या घटनेची बदलापूरमध्ये पुनरावृत्ती केली होती. मुख्य आरोपीचा एन्काउंटर करत पोलिसांनी गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एका चिमुकलीला लक्ष्य केल्याने गुन्हेगारांना कायद्याचा तथा पोलिसांचा धाक उरला नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!