क्राईम जगत

हरिनाम सप्ताहात पडला रक्ताचा सडा

कौटुंबिक कलहातून नासवले रक्त;"भांडू नका" म्हणणे जीवावर बेतले

चिखली (बुलढाणा): अत्यंत शांतताप्रिय गाव म्हणून हातणी (ता.चिखली) ची ओळख. या गावात सध्या हरिनाम सप्ताह सुरू असल्याने सगळीकडे हरिनामाचा गजर कानावर पडत असून गावातील वातावरण प्रसन्न झालेले आहे. ग्रामस्थ रात्रीच्या या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे बघून खुमखुमी मनात असलेल्या पित्यास्वरूप सख्ख्या काकाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने सपासप वार करून पुतण्याचा खून केला. सप्ताहाच्या पवित्र वातावरणात घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तर घटनेच्या अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपी काकाच्या मुसक्या आवळल्या असून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
हातणी येथील रहिवासी असलेले रामचंद्र मारुती जाधव हे २१ जानेवारीच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या घरी जेवण करत होते. याच वेळी त्यांचा मुलगा विनोद रामचंद्र जाधव उर्फ मंत्री हा घरी आला आणि किरकोळ कारणावरून त्याची पत्नी मीरा हिच्याशी भांडू लागला. घरामध्ये पती-पत्नीचे मोठे वाद सुरू झाले. वयोवृद्ध वडील रामचंद्र यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र सून मीरा हिने त्यांनाच दम भरला. “आमच्या भांडणात मध्ये पडू नका,” असे म्हणत तिने सासऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. आजोबांना मिळणारी वागणूक आणि घरातील रोजचा कटकटीचा आवाज ऐकून मृत गोपाल अजाबराव जाधव (वय २४ वर्षे) तेथे गेला. त्याने काका विनोद आणि काकू मीरा यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या रोजच्या या भांडणामुळे समाजात आपली बदनामी होत आहे. तुम्हाला वाद घालायचे असतील, तर या घरात राहू नका, असे मीराला म्हणाला. त्याने समजूतदारपणाने वापरलेले हे शब्द विनोदच्या मनात चांगलेच घट्ट बसले. नव्हेतर त्याने हत्येचा कट रचला. रात्री अकरा वाजताच्या सुमारास विनोदने रागाच्या भरात घरातील कुऱ्हाड उचलली आणि गोपालच्या डोक्यावर, छातीवर कुऱ्हाडीचे सपासप वार केले. वर्मी घावामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गोपालचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हत्याकांडानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याची भनक लागताच आरोपी विनोद जाधव उर्फ मंत्रीने गावातून पळ काढला आणि लगतच्या मक्याच्या शेतात जाऊन लपला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात चिखली ठाणेदार भूषण गावंडे यांनी तात्काळ तपास पथके रवाना केली. गुन्हे शोध पथकाने अवघ्या दोन तासांत गुप्त खबऱ्यांकडून, तसेच तांत्रिक माहिती काढून आरोपी विनोदला मक्याच्या शेतातून बेड्या ठोकल्या.
वडिलच बनले फिर्यादी
आपल्या डोळ्यादेखत नातवाचा खून झाल्याने खचलेल्या रामचंद्र जाधव यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोपी विनोद जाधव याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिताचे कलम १०३ (१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवतकर हे करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!