क्राईम जगत

मलकापुरात: “त्या” हल्ल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मलकापूर शहरातील वर्दळीच्या चारखांब परिसरात आज २३ जानेवारीच्या दुपारी भंगार विक्रेत्यांमध्ये झालेल्या आर्थिक वादाचे रूपांतर रक्तरंजित लढाईपर्यंत जाऊन पोहोचले होते. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या वादात चाकूने प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत मजल गेली होती. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
खामगाव आणि मलकापूर येथील एकाच समाजातील दोन भंगार विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारावरून धुसफूस सुरू होती. मोहम्मद रियाजुल मोहम्मद इलीयास (वय ३५ वर्षे) रा.चारखांबा चौक यांचे मलकापूर शहरात भंगारचे दुकान आहे. आरोपी गुलाम मोहम्मद अब्दुल रजाक (रा.नांदुरा) हा देखील भंगार व्यापारी असून तो जळगाव येथून माल खरेदी करतो. फिर्यादीच्या भावाने देखील त्याच व्यापाऱ्याकडून भंगाराचा माल घेतल्याचा राग मनात धरून आज २३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास आरोपी गुलाम मोहम्मद याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या भावास गाठून त्याच्या पोटात चाकू खुपसला. तसेच त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन आरोपींनी देखील संगनमत करून फिर्यादी व साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली होती. या जीवघेण्या हल्ल्यात एक गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी मोहम्मद रियाजुल मोहम्मद इलीयास यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी गुलाम मोहम्मद अब्दुल रजाक उर्फ गुल्लु (वय ३० वर्षे), जुबेर खान हमीद खान (वय ३२ वर्षे) आणि आसिफ खान मलंग खान (वय २५ वर्षे), तिघेही रा.नांदुरा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!