क्राईम जगत
युवतींचा संताप:पगारासाठी बॉसला धो-धो धुतले
ऑफिसमध्येच केला "राडा"; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): शहरातील सिडको भागातील एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये “टार्गेट” आणि “रिपोर्ट” या शब्दांमुळे चांगलाच तणाव निर्माण झाला. नव्हेतर चक्क “राड्या”चे रूप घेतल्याचा प्रकार समोर आला. दोन महिन्यांचा पगार थकवल्याच्या रागातून सहा तरुणींनी एचआर मॅनेजरसह आपल्या बॉसला “दे दणादण” चोप दिला. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही,तर राग अनावर झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीने चक्क कॉम्प्युटरच बॉसच्या डोक्यात घातला! या प्रकरणी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिडको एन-५ परिसरात सचिन लक्ष्मण मलीक (रा.तिसगाव ता.गंगापूर) यांच्या मालकीचे “क्वीक झी” नावाचे मार्केटिंग ऑफिस असून याठिकाणी महिला कर्मचारी कामाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. कर्मचारी पगाराची मागणी करत होते. मात्र, त्यांना समर्पक उत्तरे मिळत नव्हती. २२ जानेवारी रोजी सचिन मलिक नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचले. पण, तिथे आधीच सहा महिला कर्मचारी रणरागिणीचे रूप घेऊन उभ्या होत्या. तसेच त्यांच्या एकीची आणि दुसरीचा पती देखील होता. या कर्मचाऱ्यांनी सचिन मलिक यांना आपला हक्काचा पगार मागितला असता, त्यांनी “तुम्ही काय काम केले? आधी मला कामाचा रिपोर्ट द्या, मग पगाराचे बघू.” असे शब्दप्रयोग केले. मग काय, हा “रिपोर्ट” शब्द बॉसला चांगलाच नडला! पगार मागितल्यानंतर कामाचा जाब विचारला म्हणून कर्मचारी तरुणींचा संताप अनावर झाला. नव्हेतर ऑफिसचे रूपांतर कुस्तीच्या आखाड्यात झाले. संतप्त झालेल्या एचआर मॅनेजर स्नेहा यांच्यासह अश्विनी, सृष्टी, ऋतिका, सायली आणि अपेक्षा या सहा तरुणींनी बॉसला रिंगणात घेतले. शिव्यांची लाखोळी वाहत सचिन मलिकला चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यातील अश्विनीच्या पतीने तर चक्क टेबलावरचा कॉम्प्युटर उचलून सचिन मलिकच्या डोक्यात घातला. त्यामुळे ते रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले.जखमी अवस्थेतच सचिन यांनी सिडको पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून युवतींच्या तावडीतून सचिन मलिक यांची सुटका केली.
या प्रकरणी सचिन मलिक यांनी सिडको पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एचआर मॅनेजर स्नेहा हिच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार भानुदास खिल्लारे हे करीत आहेत. पगार थकवून “रिपोर्ट” मागणाऱ्या बॉसला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या “प्रॅक्टिकल रिपोर्ट”ची चर्चा सिडको परिसरात चांगलीच रंगली आहे.



