
बुलढाणा,(प्रतिनिधी): भारतीय सैन्य दलात देशाची सेवा करून निवृत्त झालेले,आणि सध्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्हा परिषदेत कर्तव्य बजावत समाजाची सेवा करणारे गणेश शाळिग्राम सरोदे यांच्या सुपुत्रीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या “परीक्षा पे चर्चा २०२६” या उपक्रमांतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाने समृद्धीने केवळ स्पर्धेत बाजी मारली नाही, तर आपल्या नावाला सार्थ ठरवणारी कामगिरी करून दाखवली. तिच्या या यशामुळे शाळेचा, पालकांचा तसेच बुलढाणा व वाशीम या दोन जिल्ह्यांचा देखील गौरव वाढवला.
धाड आणि पंचक्रोशीच्या सामाजिक, राजकीय,धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेलं एक नाव म्हणजे सरोदे कुटुंब.शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या दिवंगत शालिग्रामआण्णा सरोदे यांच्या पश्चात समाधान आणि किरण यांनी शेती आणि व्यवसाय सांभाळून समाजसेवा करत आहेत. तर गणेश सरोदे यांनी भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून देशसेवा केली असून सध्या ते वाशीम जिल्हा परिषदेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांची सुपुत्री समृद्धी ही पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत असून तिने पीएमश्री केंद्रीय विद्यालयाअंतर्गत आज २३ जानेवारी रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत “परीक्षा पे चर्चा” या विषयावर आधारित कठीण प्रश्नांची उत्तरे देत प्रथम क्रमांक पटकावला. समृध्दीने केवळ भौतिक सुखातच नव्हे, तर ज्ञानाच्या बाबतीतही समृद्ध असणे हे आयुष्यात महत्त्वाचे असते, हे हेरून शालेय जीवनात ज्ञानाची ही “संपन्नता” मिळवत यशाचे शिखर गाठले. तिने पटकावलेला हा प्रथम क्रमांक म्हणजे तिच्या उज्ज्वल भविष्याची आणि निरंतर प्रगतीची नांदी ठरली आहे.
समृद्धीच्या या यशात तिचे वडील “गणेश” सरोदे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. हिंदू संस्कृतीत “गणेश” हे नाव बुद्धी, ज्ञान आणि विवेकाची देवता म्हणून ओळखले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ज्या नावाने होते, त्या “गणेशा”च्या आशीर्वादाने आणि वडिलांच्या पाठबळामुळे समृद्धीने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. नव्हेतर धाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


