महाराष्ट्र माझा
झोपडीधारकांच्या ७ वर्षांच्या थकीत भाड्याचा प्रश्न मार्गी
संजय नगरमधील ५२ झोपडीधारकांना दिलासा; प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्याला यश

मुंबई,(प्रतिनिधी): गेल्या ७ वर्षांपासून विकासकाकडून रखडलेल्या थकीत भाड्याचा प्रश्न आता निकाली निघाला असून प्रहार जनशक्ती पक्ष आणि महाराष्ट्र एसआरए हक्क समितीच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे संजय नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ५२ पात्र झोपडीधारकांचा ७ वर्षांच्या थकीत भाड्याचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संजयनगर पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या ५२ झोपडीधारकांना विकासकाकडून मागील ७ वर्षांचे आणि चालू वर्षाचे भाडे मिळाले नव्हते. हक्काचे पैसे मिळत नसल्याने स्थानिक रहिवासी आर्थिक अडचणीत सापडले होते. ही बाब समोर येताच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र एसआरए हक्क समितीचे प्रमुख अजय तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक संध्या बावनकुळे यांच्या दालनात यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व ५२ पात्र झोपडीधारकांनी आपली बँक खात्याची माहिती, पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड सहकार विभागाच्या ऑडिटरकडे ८ दिवसांच्या आत सादर करावे. ही कागदपत्रे प्राप्त होताच मागील ७ वर्षांचे आणि चालू वर्षाचे एकत्रित भाडे थेट झोपडीधारकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक देवयानी गुणाजी दळवी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, विकासक मेसर्स मनियार रिअल्टर (फॉर्च्यून क्लासिक) यांच्याकडे थकीत असलेली एकूण ७ कोटी ७४ लाख ६७ हजार ४३१ रुपये इतकी रक्कम प्राधिकरणाने तात्काळ जमा करण्याचे आदेश विकासकाला देण्यात आले आहे. रक्कम वेळेत जमा न झाल्यास विकासकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या लढ्यामध्ये महाराष्ट्र एसआरए हक्क समितीचे एसआरए सेल अध्यक्ष विनय वामन हुले आणि उत्तर मुंबई जिल्हाप्रमुख श्रीराम नाडे यांनी विशेष पुढाकार घेतला. आपल्या हक्काचे भाडे मिळवून दिल्याबद्दल झोपडीधारकांनी बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.


