क्राईम जगत

धाडची खाकी झोपली? पोलिसांच्या नाकाखालीच चोरट्यांचा डल्ला

पोलीस स्टेशनच्या १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी लंपास!

धाड (प्रतिनिधी): एकीकडे पोलीस अधीक्षक गुन्हेगारांचे कंबरडे मोडून गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तर दुसरीकडे धाड पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करत आहेत. अशाच कसुरीचा प्रत्यय धाडवसियांना आला. ३ जानेवारीच्या रात्री धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर चोरट्यांनी दोन, तर २१ जानेवारीच्या रात्री एक दुचाकी चोरून पोलिसांना “सलामी” दिली. विशेष म्हणजे २१ जानेवारीच्या रात्रीची चोरी एका पोलीस अंमलदाराच्या घरासमोरून झाली. पोलीस स्टेशनच्या “हाकेच्या अंतरावर” घडलेल्या या घटनांमुळे सुरक्षित कोण?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यातील दोन दुचाकी चोरींबाबत पोलिसांत गुन्हा दाखल नाही. तर तिसऱ्या घटनेत २३ जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
धाड पोलीस स्टेशनपासून पूर्वेला अवघ्या १०० मीटरवर असलेल्या एचडीएफसी बँक समोरून एक, पश्चिमेला १५० मीटरवर असलेल्या हॉटेल निराळापासून दुसरी, तर दक्षिणेला २०० मीटर अंतरावरून तिसरी, अशा तीन दुचाकी चोरीला गेल्या. यातील दोन एकाच रात्री चोरीला गेल्या, हे विशेष! पोलिसांची नियमित रात्रगस्त असते. या गस्तीसाठी चेकिंग अधिकारी नेमल्या जातात. ३ जानेवारीच्या रात्री देखील चेकिंग अधिकारी नेमलेले असतीलच, यात शंका नाही. या रात्री नेमलेल्या चेकिंग अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य खरंच प्रामाणिकपणे पार पाडले का?, हे त्यांनाच माहित. पण, धाड पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले अर्धेअधिक कर्मचारी रात्रीच्या गस्तीवेळी केवळ “कागदोपत्री” कर्तव्य बजावण्यात धन्यता मानतात, असा आजवरचा अनुभव आहे. वरिष्ठांना दाखवण्यासाठी एखाद्या पॉइंटवर जाऊन सेल्फी काढायचा, तो व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकायचा, आणि आम्ही कर्तव्यावर हजर आहोत, हे अधिकाऱ्यांना दाखवायचे, असे प्रकार धाडमध्ये काही नवीन नाही. असा काही प्रकार ३ जानेवारीच्या रात्री तर झाला नाही ना?, पोलीस स्टेशनमध्ये तसेच रस्त्यांवर सन्नाटा बघून चोरट्यांनी संधी तर साधली नाही ना?, हे तपासणे गरजेचे आहे. चोरीस गेलेल्या दुचाकी कोणाच्या?, ते तक्रार देण्यास गेले होते का?, गेले असतील तर त्यांनी तक्रार का दिली नाही?, किंवा पोलिसांनी तक्रार का घेतली नाही?, या सर्वात मोठा संशोधनाचा विषय असून स्थानिक ठाणेदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा कसून शोध घेण्याची गरज आहे.
कारवाईचा आसूड ओढायला हवा
पोलीस स्टेशनच्या १०० मीटर परिसरात चोऱ्या होत असतील, तर हद्दीतील खेडे गावे आणि टाऊनमधील गल्ल्या किती सुरक्षित असतील, याची कल्पना न केलेली बरी. बहुतांश कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात, हे नाकारून चालणार नाही. मात्र, जर कोणी गस्तीचा केवळ फार्स करून खात्याशी आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून जनतेशी बेइमानी करत असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी शिस्त आणि कारवाईचा आसूड ओढल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!