स्मार्ट बुलढाणा
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी संघटना कटीबद्ध:संदीप शिंदे
कामगार संघटनेचा विभागीय मेळावा उत्साहात

बुलढाणा,(प्रतिनिधी): एसटी महामंडळातील कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पूर्ण ताकदीने कटीबद्ध आहे, असा निर्धार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केला.

बुलढाणा येथे आयोजित संघटनेचा विभागीय मेळावा आणि वार्षिक आमसभेत ते बोलत होते. या मेळाव्यादरम्यान इंटक, कष्टकरी जनसंघ, कामगार सेना आणि सेवाशक्ती, अशा विविध संघटनांमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला. या सभेत संघटनेच्या विभागीय जबाबदाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली असून राजेंद्र पवार यांची विभागीय सचिवपदी, तर महादेव दिवनाले यांची विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.पुढे बोलतांना संदीप शिंदे यांनी मागील आर्थिक करारातील प्रलंबित विषय आणि एसटी कामगारांच्या हक्काचे वेतन यासाठी संघटना लवकरच मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सांगितले. मेळाव्यानंतर शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांची भेट घेतली. या बैठकीत विभागीय वाहतूक अधिकारी रामकृष्ण जाधव, गोविंदा जवंजाळ आणि विभागीय लेखा अधिकारी अनिल बहिरम उपस्थित होते. प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनांनुसार कालमर्यादेत कार्यवाही करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. तर आ.संजय गायकवाड यांच्या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी रणनीती आखणे आणि थकबाकी संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. आचारसंहिता संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आ. गायकवाड यांनी दिले. तसेच तिकीट दरवाढ ५ रुपयांच्या पटीत करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या मेळाव्यास प्रादेशिक सचिव मनोज पाटील, कार्याध्यक्ष शहाजी देवकते यांच्यासह बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मलकापूर, मेहकर आणि जळगाव जामोद आगाराचे सचिव व अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिखली आगारातून शिवा जायभाये, जीवन डोमळे, राजू वायाळ यांच्यासह विभागीय कार्यशाळेतील जिया चौधरी, अमित गोयर आणि महिला प्रतिनिधी ज्योती इंगळे यांनीही सभासदत्व स्वीकारले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संतोष बावस्कर, साहेबराव कुन्नर, सचिन शेळके, मंगेश ढोंण, दीपक निकम यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.



