स्मार्ट बुलढाणा

शासन आदेशाला हरताळ, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

चिंचपूर जि.प. शाळेत शिक्षक गैरहजर, शाळा बंद आंदोलनाचा इशारा

खामगाव,(प्रतिनिधी): तालुक्यातील चिंचपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक टंचाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत एकूण १० शिक्षक पदे मंजूर असून त्यापैकी एक पद रिक्त आहे. अशा परिस्थितीत शिक्षक निलेश विश्वंभर जाधव यांनी शासनाने दिलेल्या स्पष्ट आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये व शालेय व्यवस्थापन समितीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षक निलेश जाधव हे यापूर्वी चिंचपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र तात्पुरत्या स्वरूपात सेवा अधिग्रहित करून दिलेल्या शाळेवर ते कार्यरत होते. चिंचपूर शाळेत शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन, त्यांची पुन्हा चिंचपूर शाळेवर बदली करून रुजू करण्यात यावे, यासाठी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी दिनांक २४ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते. या मागणीचा पाठपुरावा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश आंभोरे यांनी सातत्याने केला होता. अखेर शासनाने दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी शिक्षक निलेश जाधव यांनी चिंचपूर शाळेवर रुजू व्हावे, असा स्पष्ट आदेश दिला. मात्र, हा आदेश धुडकावून लावत संबंधित शिक्षक अद्याप शाळेवर रुजू झालेले नाहीत. या मागे स्वत:चा स्वार्थ व राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शिक्षकांशी संपर्क साधला असता, आपण मेडिकल सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शाळा प्रशासनाकडून चौकशी केली असता, संबंधित शिक्षकांनी कोणताही मेडिकल सुट्टीचा अर्ज अथवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे.या प्रकारास शिक्षक निलेश जाधव पूर्णत: जबाबदार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे. तसेच २३ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात, तीन दिवसांच्या आत शिक्षक शाळेवर रुजू न झाल्यास चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धोरणापाही विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून संतापलेल्या पालकांनी मोठे आंदोलन उभारल्यास आश्चर्य वाटायला नको, म्हणजे झाले!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!