स्मार्ट बुलढाणा

क्लेशदायक! ध्वजारोहण करतांना मुख्याध्यापकांचा मृत्यू

तिरंग्याच्या साक्षीनं घेतला जगाचा निरोप;मोहेगावसह शिक्षण क्षेत्रात हळहळ

बुलढाणा,(प्रतिनिधी): संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या जल्लोषात न्हाऊन निघत असतानाच, मोहेगाव (ता.मोताळा) येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तिरंग्याच्या छायेतच त्यांची प्राणज्योत मालवली आणि काही क्षणातच आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर आक्रोशात झाले.
मोताळा तालुक्यात येणाऱ्या मोहगाव येथील २६ जानेवारीची सकाळ… शाळेचा परिसर फुलांनी आणि रांगोळीने सजला होता. शाळेतील चिमुकले विद्यार्थी पांढऱ्या गणवेशात उत्साहाने रांगेत उभे होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी मुख्याध्यापक दिलीप राठोड पुढे सरसावले. मात्र, ध्वज फडकवण्यापूर्वीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि सर्वांच्या देखत ते जमिनीवर कोसळले. उपस्थित शिक्षक आणि ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना रुग्णालयात हलविले. परंतु वाटेतच त्यांची साथ सुटली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच मोहेगाववर दुःखा डोंगर कोसळला. राठोड हे केवळ मुख्याध्यापकच नव्हते, तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि गावाचे भूषण होते. त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या ओढीमुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे. आपल्या कार्यतत्परतेसाठी ओळखले जाणारे मुख्याध्यापक दिलीप राठोड यांनी शाळेचा निकाल सुधारण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासापर्यंत नेहमीच पुढाकार घेतला. प्रजासत्ताक दिनी दिलेली ही “अखेरची सलामी”  गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात कायमची सलत राहणार आहे. प्रजासत्ताक दिनाचा हा सूर्योदय मोहेगावसाठी काळोख घेऊन आला. एका कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या अशा जाण्याने संपूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!