क्राईम जगत

देऊळगाव राजातील मंदिर चोऱ्यांचा पर्दाफाश

दोन आरोपींना ठोकल्या बेड्या: स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बुलढाणा,(प्रतिनिधी): बालाजीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा शहरात मंदिरांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला व देऊळगाव राजा पोलिसांना यश आले. श्रद्धेच्या स्थानांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून १ लाख २३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मंदिरातील दागिन्यांसह चोरीच्या मोटारसायकलचाही समावेश आहे.
देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध चौडेश्वरी मंदिर, धोंडीराम महाराज मठ आणि कोंडवाडा मारोती मंदिर या तीन धार्मिक स्थळांचे २१ जानेवारी २०२६ च्या रात्री कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, पंचधातूच्या मूर्ती आणि दानपेटीतील रोख रकम चोरून पोबारा केला होता. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी मंदिराचे सचिव विनोद पन्हाळे यांनी २२ जानेवारी रोजी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रीवरुक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरवली. तर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी मंदिरांमधील चोरीकडे केवळ गुन्हेगारी म्हणून न पाहता जनतेच्या आस्थेचा विषय म्हणून बघत चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावण्याचे आदेश बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथक तयार केले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोनि सुनील अंबुलकर, पोउपनि प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, निलेश राजपूत, महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव आणि देऊळगाव राजाचे पोनि ब्रम्हा गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण करून खबऱ्यांकडून गुप्त माहिती काढली असता, दोन संशयित आरोपींची नावे samor आली. आरोपी चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असतानाच आज २७ जानेवारी २०२६ रोजी पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोप शेख अन्सार ऊर्फ छोट्या शेख अजमोद्दीन (वय २५ वर्षे), रा. बाभुळखेड, ह.मु. दत्त नगर, देऊळगाव राजा) आणि अरविंद लक्ष्मण शिंदे (वय ३५ वर्षे), रा. संजय नगर, देऊळगाव राजा) याच्या मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच चोरीतील पंचधातूची उत्सव मूर्ती, (वजन ६ किलो ८१० ग्रॅम, किंमत ४ हजार रुपये), चांदीच्या पाटल्या, चांदीचा टोप, कमरपट्टा, चांदीचा मोठा टोप, दत्ताची मूर्ती आणि चांदीच्या मासोळ्या. (एकूण चांदीची किंमत ५० हजार रुपये), गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (किंमत ८० हजार रुपये), असा मुद्देमालाही पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यामुळे उपरोक्त गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली.
चोरीसाठी चोरीचीच दुचाकी!
 या आरोपींनी केवळ मंदिरेच लुटली नाहीत, तर चोरी करण्यासाठी त्यांनी साखरखेर्डा येथून एक होंडा शाइन मोटारसायकल चोरली होती. याच दुचाकीचा वापर करून त्यांनी तिन्ही मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, हे विशेष!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!