क्राईम जगत
मलकापूरच्या वाघोळा शिवारातून १६ वर्षांचा मुलगा “किडनॅप”!
वाघोळा शिवारात भीतीचे वातावरण; दसरखेड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): अवघ्या १६ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची खळबळजनक घटना मलकापूर तालुक्यातील वाघोळा परिसरात घडली.जिल्ह्यात एकीकडे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा होत असतानाच दुसरीकडे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोळा (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले शेतकरी सचिन कडू कांडेलकर (वय ५० वर्षे) यांचा मुलगा श्याम सुनील कांडेलकर (वय १६ वर्षे) हा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वाघोळा शिवारात होता. बराच वेळ उलटूनही श्याम घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावातील सर्व संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, श्यामचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, अज्ञात इसमाने आमिष दाखवून, तसेच फुस लावून श्यामला पळवून नेल्याची तक्रार सचिन कांडेलकर यांनी दसरखेड एमआयडीसी पोलिसांत दिली. पोलिसांनी आज २७ जानेवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली असून पुढील तपास फिरवली आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्ष विजय टेकाळे हे करीत आहेत. भरदिवसा एका मुलाला पळवून नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपीने मुलाला नेमक्या कोणत्या कारणाने पळवले, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे आहे. दरम्यान, श्याम सुनील कांडेलकर याच्याबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने बुलडाणा एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



