राजकारण
शेगाव: मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध “वंचित” आक्रमक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळल्याच्या निषेधार्थ आंदोलन

शेगाव,(प्रतिनिधी): राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज २७ जानेवारी रोजी वंचितांच्या वतीने शेगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकमधील शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख केला नाही. यावर तिथे उपस्थित असलेल्या माधवी जाधव या वनरक्षक महिला कर्मचाऱ्याने जाहीर आक्षेप नोंदवला. “संविधान आणि आंबेडकरांचे नाव संपवण्याचा हा प्रयत्न आहे,”, अशा भावना व्यक्त करणारा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या आदेशानुसार आज २७ जानेवारी रोजी शेगाव येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांचे मंत्रीपद तात्काळ परत घ्यावे, अशी आक्रमक मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आहे.
शेगाव तालुका अध्यक्ष प्रविण विरघट यांनी यावेळी सरकारवर जोरदार प्रहार करत प्रजासत्ताकदिन म्हणजे संविधानाचा उत्सव आहे आणि त्याच दिवशी संविधानाच्या शिल्पकाराचे नाव न घेणे ही बाब महायुती सरकारची मानसिकता दर्शविणारी आहे. माधवी जाधव यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.



