क्राईम जगत
जळगाव जामोद: यात्रेतील वादातून तोडला काकाचा हात
रक्तरंजित हाणामारी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

अजय टप
जळगाव जामोद: यात्रेत दुकान लावण्याच्या कारणावरून वाद झाला. नव्हतर याच वादातून आरोपींनी काठीने अमानुष मारहाण केली. या रक्तरंजित हाणामारीत एकाचा हात फॅक्चर झाला. धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमाला गालबोट लावणारी ही हिंसक घटना इलोरा चावरा (ता.जळगाव जामोद) येथे घडली. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी बाप-लेकांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जवळा बाजार (ता.नांदुरा) येथील रहिवासी असलेले प्रल्हाद रामकृष्ण इंगळे (वय ३८ वर्षे) हे २४ जानेवारी २०२६ रोजी इलोरा चावरा येथील यात्रेत दुकान लावण्यासाठी गेले होते. संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास दुकान लावण्याच्या जागेवरून आरोपी शरद रामदास बावणे याने त्यांच्यासोबत वाद घातला. शाब्दिक वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि त्यानंतर मारहाणीत झाले. यावेळी शरदने प्रल्हादला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रल्हादचे काका भागवत पंजाजी इंगळे यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, चवताळलेल्या आरोपी पवन रामदास बावणे याने त्यांच्यावर काठीने हल्ला केला. या हल्ल्यात हातात काठी घेऊन थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात भागवत इंगळे यांचा हात फॅक्चर झाला. याच वेळी आरोपी रामदास बावणे याने देखील फिर्यादी आणि त्यांच्या काकांना चापटबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. तसेच पुन्हा यात्रेत दिसल्यास जीवने मारण्याची धमकी दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून गजानन इंगळे व शत्रुघ्न इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून दोघांची सुटका केली. त्यावेळी देखील आरोपी शरद आणि पवन बावणे यांनी पुन्हा या यात्रेत आलात किंवा दुकान लावले, तर तुमचे हातपाय तोडून टाकू आणि तुम्हाला जिवानिशी खल्लास करू, अशी धमकी दिली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी प्रल्हाद इंगळे यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रामदास बावणे, शरद बावणे आणि पवन बावणे (सर्व रा.अकोला खुर्द) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११५ (२), ११८ (२), ३५१ (३), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार भागवत उबरहंडे हे करीत आहेत.



