महाराष्ट्र माझा

‘राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम

स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर

मुंबई: ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मूलभूत सैनिकी प्रशिक्षण, प्रबोधन, योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम ‘आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

‘राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य’ मिशन संदर्भात मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एनसीसी राज्य समन्वयक अधिकारी संतोष धाम आणि भोसले, ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी राहुल पाटील, समाज प्रबोधनकार अक्षय महाराज भोसले आणि सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे उमेश महाराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञान न देता, येणारी पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि संस्कारांनी समृद्ध असावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यात येणार असून यामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेअंतर्गत हे अभियान राबविले जाणार आहे.
या अभियानांतर्गत पाच प्रमुख स्तंभांवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार प्रशिक्षकांमार्फत राज्यातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. मुलभूत सैनिकी प्रशिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेट्सच्या माध्यमातून संचलन (परेड), कवायत आणि मूलभूत सैनिकी शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रथम, संस्कार, मूल्यप्रबोधन, शिक्षणाचे महत्व, एकाग्रता, मनोबल, अभ्यास, शुद्धबुद्धी, विवेक, तारतम्य, संवाद, मृदुवचन, शब्द सामर्थ्य, अहिंसा, क्षमा, करुणा, दया, लोकसंग्रह, व्यवहार, समता आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील १० हजार प्रबोधनकार शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व विविध क्षेत्रांतील विचारवंतांचाही सहभाग असेल. योग प्रशिक्षणाअंतर्गत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने १० हजार योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढवण्यासाठी योग प्रशिक्षणाचे कार्य करतील. तर आरोग्य समुपदेशन (छत्रपती संभाजीनगर मॉडेल) करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करून संतुलित आहार, पोषण मूल्य आहार सवयीचे महत्व, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे महत्व सांगितले जाईल. विशेषतः मोबाईल, संगणक व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदू, झोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजवून सांगण्यासह विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सूचित केले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!