क्राईम जगत
क्राइम मास्टरप्लॅन: दोन जावा, दोन प्रियकर आणि इसमाचा खून!
अनैतिक संबंधात अडसळ ठरल्याने गेला जीव

अजय टप
बुलढाणा : जिल्ह्यातील एका तालुक्यात गत महिनाभरापूर्वी झालेल्या “त्या” रहस्यमय खुनाची किनार वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीला आत्महत्या, त्यानंतर अपघात म्हणून पाहिल्या जाणारी “ती” घटना प्रत्यक्षात नियोजित ‘क्राइम मास्टरप्लॅन’ असल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. या हत्येमागील दोन चुलत भावंडे आणि त्यांच्या सोबत दोन सख्या जावांच्या “अनैतिक संबंधांचा” घाणेरडा चेहरा देखील पोलीस तपासात उघडला पडला आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या एका तालुक्यात एका इसमाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला या घटनेकडे आत्महत्या, नंतर अपघात म्हणून बघितल्या गेले. मात्र, मृतकाच्या शरीरावर असलेल्या जखमांनी पोलिसांना वस्तुनिष्ठ तपास करायला मजबूर केले. गंभीर व किचकट गुन्ह्यांच्या तपासात पारंगत असलेल्या संबंधित तपास अधिकाऱ्यांनी गोपनीय खबऱ्याकडून माहिती काढली. तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यातून सदर इसमाचा खून झाल्याचे समोर आल्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याचे मृतकाच्या भावजाई सोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच आपल्या चुलत भावाचे मृतकाच्या पत्नीचे अनैतिक सबंध असल्याचाही जबाब त्यांनी पोलिसांना दिला. क्रॉस तपासणी करण्यासाठी पोलिसांनी मृतकाच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर समोर आलेल्या माहितीने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या जावांचे लगतच शेती असलेल्या दोन चुलत भावंडांसोबत हे सूत जुळले होते. काबाडकष्ट करणारा मृतक व्यवसायासाठी बाहेर पडला की, या दोन्ही जावा कामाच्या बहाण्याने आपल्या शेतात जायच्या आणि आपापल्या प्रियकरासोबत गुलछर्रे उडवायच्या. याची भनक मृतकाला लागली. त्यामुळे तो पत्नीवर पाळत ठेऊ लागला. हीच बाब पत्नीला खटकली आणि आपल्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या पतीबद्दल तिने प्रियकराला सांगितले. हे ऐकून बिथरलेल्या आरोपींनी त्याचा काटा काढायचे ठरवले आणि एकेदिवशी त्याची निर्घृण हत्या करून त्याला यमसदनी धाडले. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपींचा मुक्काम सध्या जिल्हा कारागृहात आहे.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींचे सूत “त्या” दोन्ही जावांसोबत जुळलेले होते. मृतक त्यांच्या सोबत अनैतिक संबंधात अडसर ठरत होता, हे खरं असले तरी, मृतकाची पत्नी आणि भावजाई अर्थात “त्या” दोन्ही जावा यांचा हत्येशी काही संबंध आहे का?, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे यातील अधिक सत्य पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावरच बाहेर येणार आहे. त्यामुळे पोलीस तपासात काय निष्पन्न होते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुलिस के हाथ सचमूच लंबे होते हैं
भले मोठे आव्हान ठरलेला हा गुन्हा पोलिसांनी मोठ्या शिताफीने हाताळला. कोणतेही पुरावे नसतांना त्यांनी सूक्ष्म दृष्टीने याकडे लक्ष केंद्रित केले. तांत्रिक विश्लेषण करून मोबाइल टॉवरचे लोकेशन्स, कॉल डिटेल्स काढत या हत्याकांडातील आरोपींना जेरबंद केले. नव्हेतर या रहस्यमय कहाणीचा उलगडा करत, “पुलिस के हाथ सचमूच लंबे होते हैं”, हे दाखवून दिले.



