क्राईम जगत
राजूर हादरले! मूर्तीच्या धाब्यावर मध्यरात्री तुफान राडा
परस्परविरुद्ध तक्रारीवरून गुन्हे दाखल; हाणामारीत तलवारी, काठ्यांचा वापर; हॉटेलची तोडफोडही झाली

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : जेवणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर एका मोठ्या हाणामारीत होऊन यामध्ये दोन गंभीर जखमी झाल्याची घटना २८ जानेवारीच्या रात्री मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारात असलेल्या “हॉटेल आनंद सागर” येथे घडली. या घटनेत परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन्ही गटांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहरू नगरमध्ये राहणारा योगेश गोपीचंद चव्हाण (वय २४ वर्षे) आणि त्याचा मित्र हर्षल पवार हा २८ जानेवारीच्या रात्री ९ वाजता जेवण करण्यासाठी आनंद सागर धाब्यावर गेला होता. धाब्यावरील कामगारांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला आणि हॉटेल मालक आणि दोन कामगारांनी योगेशला लोटपाट करून शिवीगाळ केली. तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची फिर्याद योगेशने बोरखेडी पोलिसांत दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५, ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे, हॉटेल मालक हसन शहा उमर शहा (वय ३० वर्षे) रा. कोथळी यांनी आरोपी योगेश चव्हाण आणि हर्षल पवार हे लोखंडी रॉड घेऊन धाब्यावर आले. त्यांनी काउंटरमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांना विरोध केला असता, यातील योगेशने आपल्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. तसेच आपल्या वडिलांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, हॉटेलवर आलेल्या योगेशचा भाऊ, योगेश आणि हर्षल या तिघांनी धाब्यावरील प्लास्टिक खुर्च्या, टेबल आणि काउंटरची तोडफोड करून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार बोरखेडी पोलिसांत केली. या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश चव्हाण, हर्षल पवार आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ११८(१), ११५, ३२४ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने बोराखेडी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंगेपल्लु, तर दुसऱ्या प्रकरणाचा तापस बळीराम खंडागळे हे करीत आहेत.



