
अजय टप
लोणार: लोणार तालुक्यातील खापरखेड घुले येथे मद्यधूंद तरुणाने एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी बिबी पोलिसांत उपरोक्त आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीबी (ता.लोणार) पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खापरखेड घुले येथील रहिवासी असलेले गोविंदा माना राठोड (वय ७५ वर्षे) हे २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेजवळून जात होते. त्यावेळी गावातील रहिवासी आणि दारूच्या नशेत असलेला आरोपी अर्जुन प्रकाश चव्हाण याने गोविंदा राठोड यांना “तू माझ्या नातीला का बोलतो?”, असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राठोड यांनी त्याला शिवीगाळ करण्यास मज्जाव करताच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनीच मारहाण करत कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांच्या उजव्या पायाच्या नळगीवर, दोन्ही हातांवर आणि गळ्यावर जबर प्रहार केले. या हल्ल्यात गोविंदा राठोड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालय उपचार सुरू आहे.
या प्रकरणी गोविंदा राठोड यांनी बिबी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अर्जुन प्रकाश चव्हाण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस अंमलदार बद्रीनारायण कायंदे हे करीत आहेत.



