स्मार्ट बुलढाणा

दरेगाव-मेरा बुद्रुक रस्त्यावर भीषण अपघात; पादचारी गंभीर

अजय टप
चिखली: चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक ते दरेगाव रस्त्यावर एका भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत ५३ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये चालक विशाल भास्कर चांदणे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेरा बुद्रूक येथील रहिवासी असलेले अनंता गजानन पडघान (वय २९ वर्षे) यांचे वडील गजानन जगन्नाथ पडघान (वय ५३ वर्षे) हे २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दरेगाव येथून आपल्या मेरा बुद्रूक येथील घराकडे पायी जात होते. याच दरम्यान, दरेगाव ते मेरा बुद्रूक रोडवर लोडिंग मालवाहू वाहन क्रमांक एमएच-२८-बीबी-८७८० च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा निष्काळजीपणे चालवून गजानन पडघान यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला, डोक्याला आणि नाकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकरणी त्यांचा मुलगा अनंता पडघान याने अंढेरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २९ जानेवारी रोजी आरोपी चालक विशाल भास्कर चांदणे (वय २८ वर्षे) रा.नागझरी, ता. सिंदखेड राजा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (a), १२५ (b) सह मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार भरत पोफळे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!