क्राईम जगत

मलकापूरात नकली नोटा पकडल्याने खळबळ

२० हजारात दिले होते २ लाखांचे आमिष; पोलिसांनी फसवणुकीचा डाव उधळला; दोन आरोपींना केली अटकेत

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): गुन्हेगारांचा सोईस्कर अड्डा बनत चाललेल्या आणि विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूरनगरीत यापूर्वी फसवेगिरीच्या अनेक कारवाया झालेल्या आहेत. मध्यंतरी बंद पडलेले हे धंदे करणाऱ्या टोळ्या मलकापूरमध्ये पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. स्वस्त दरात दुप्पट-तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीला मलकापूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. अवघ्या २० हजार रुपयांच्या बदल्यात ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या २ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत दिल्लीतील एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करण्याचा प्रयत्नात ही टोळी होती. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पथक २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात गस्त घालत होते. यावेळी बस स्थानकाच्या बाजूलाच्या गल्लीत यश मदनलाल गडरोया (वय १५ वर्षे) रा.नंदनगरी, उत्तर-पूर्व दिल्ली) नावाचा मुलगा पोलिसांना अत्यंत गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलीस अंमलदार योगेश प्रभाकर तायडे व त्यांच्या पथकाने मुलाजवळ जाऊन त्याची आस्थेने विचारपूस केली असता, दिल्लीहून आलेल्या या मुलाने सांगितला प्रकार ऐकून पोलीस थक्क झाले.
मलकापूर शहरातील भीमनगर परिसरातील रहिवासी असलेला आरोपी आनंद संतोष इंगळे (वय २३ वर्षे) आणि रोहित रतन महाले (वय २२ वर्षे) याने उपरोक्त मुलाला गाठून “आम्हाला २० हजार रुपये दे, आम्ही तुला त्या बदल्यात २ लाख रुपये देतो”, असे आमिष दाखवले. देण्यात येणारे २ लाख रुपये म्हणजे खऱ्या चलनी नोटा नसून खेळण्यातील “चिल्ड्रन बँक”च्या नोटा होत्या. अल्पवयीन मुलाला फसवून त्याचे कष्टाचे पैसे हडपण्याचा आरोपींचा डाव पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हाणून पाडला असून या प्रकारामुळे मलकापूर शहरात पुन्हा एकदा नकली नोटांचा विषय चर्चेत आला आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी आरोपींनी हा मार्ग निवडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश तायडे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसात भारतीय न्याय संहिताचे कलम ३१८ (२) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे हे करत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!