क्राईम जगत
महसूल अधिकाऱ्याला धमकावून पळविले अवैध वाळूचे टिप्पर
हिवरखेड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारांच्या हिंमती चांगल्याच वाढीस लागल्या आहेत. आपलं कोणीच वाकडे करू शकत नाही, या आविर्भावात गुन्हेगारांनी नंगानाच चालवला आहे. असाच काहीसा अरेरावीचा आणि धमकावण्याचा प्रकार हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत समोर आला. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका टिपर चालकाने चक्क शासकीय कर्तव्यावर असलेल्या महसूल अधिकाऱ्याला जीवे मारण्याची आणि अपघाताची भीती दाखवित अवैध वाळूने भरलेले टिप्पर पळवून नेला. कायद्याचे धिंडवडे काढणारी ही घटना २८ जानेवारी रोजी लाखनवाडा बुद्रूक येथे घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लाखनवाडा बुद्रूक येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पंढरीनाथ गजानन शिंदे (वय ४० वर्षे) हे २८ जानेवारी २०२६ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह कर्तव्यावर होते. सकाळी १०. ४० च्या सुमारास त्यांना टिप्पर क्रमांक एमएच-२८-बीबी-८८११ मधून विनापरवाना अवैध रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसले. सदर टिप्परने कौसर खान यांच्या घरासमोर रेती खाली करत असताना शिंदे यांनी तातडीने खामगाव तहसीलदारांना माहिती दिली. तसेच तहसीलदारांच्या आदेशानुसार सदर टिप्पर जप्त करून हिवरखेड पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी निघाले. त्यावेळी आरोपी दिपक आत्माराम ढोले (रा.मनसगाव ता.शेगाव) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने आंबेटाकळी चौफुलीवरून टिप्पर बोरी अडगाव रस्त्याच्या दिशेने सुसाट वेगात पळविले. एवढेच नाही तर आरोपींनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालत खाली उतर, नाहीतर अपघात करून जीवे मारू, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अपघाताच्या भीतीमुळे शिंदे काही अंतरावर टिप्परमधून खाली उतरले. त्यानंतर आरोपी सदर टिप्पर घेऊन बाळापूरच्या दिशेने पसार झाले.
या प्रकरणी पंढरीनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुक हिवरखेड पोलिसांनी आरोपी दिपक आत्माराम ढोले, एक अनोळखी इसम आणि टिप्पर मालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (३), २२१, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास
ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदा वाघमारे हे करीत आहेत. या घटनेमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गुन्हेगारांच्या नांग्या मोडण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे.



