दिनविशेष: चतुरस्त्र लेखक, कवी व गीतकार गंगाधर महांबरे यांचा जन्म

गंगाधर महांबरे हे चतुरस्त्र लेखक, कवी व गीतकार होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. १९४८ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुढे १९५६ मध्ये पुणे विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. नोकरी करीत असतानाच त्यांनी मुक्त पत्रकारिता आणि लेखन सुरू केले होते. उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत. वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी कॅसेट्स इत्यादींसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचे साहित्य नाटिका, बालसाहित्य, चरित्रे, गाण्यांचे संपादन आणि गीतसंग्रह अशा विविध प्रकारात आहे. ‘दिलजमाई’, ‘रंगपंचमी’, ‘सिंधुदुर्ग’, ‘कोल्हा आणि द्राक्षे’ अशा अनेक नाटिका. ‘देवदूत’, ‘संतांची कृपा’, ‘नजराणा’ ही नाटके. ‘गौतमबुद्ध’, ‘जादूचा वेल’, ‘जादूची नगरी’, ‘बेनहर’, ‘शुभम् करोती’, ‘किशोरनामा’, ‘मॉरिशसच्या लोककथा’ इत्यादी बालसाहित्याची पुस्तके. ‘वॉल्ट डिस्ने’, ‘चार्ली चॅप्लिन’, ‘भावगीतकार ज्ञानेश्वर’, अशी उपयुक्त पुस्तकेही त्यांनी लिहिली. या गद्यलेखनाबरोबर ‘आपली आवड’, ‘उष:काल’, ‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मराठी गझल’, ‘आनंदाचे डोही’ इत्यादी गीतसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांची गद्यलेखन शैली साधी, सरळ, प्रासादिक आहे आणि गीतांमध्ये सोपी रचना व शब्दांची अचूक निवड हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे. त्यांच्या ‘मौलिक मराठी चित्रगीते’ या पुस्तकाला २००१ साली राष्ट्रपतींनी सुवर्णकमल देऊन राष्ट्रीय सन्मान केला आणि ‘ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा’ ह्या पुस्तकाला २००८ सालचा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला. आज त्यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.



