स्मार्ट बुलढाणा

रामनामाच्या नावेत बसा,भवसागर पार व्हाल : समर्थ श्रीहरी महाराज

बुलढाण्यात तीन दिवसीय नामजप शिबिराची महाप्रसादाने उत्साहात सांगता

बुलढाणा,(प्रतिनिधी):संसार व्याप मोठा आहे. हा व्याप वाढत जाणारच आहे. हाव काही सुटायला तयार नाही. प्रपंच म्हटल्यावर घर पाहिजे, जमीन, शेती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे या सगळ्या गोष्टी आल्यात. त्यातून अधिक त्रस्तता वाढत जाते. आज मुलं असून देखील वृद्धाश्रमात आई-वडील मुक्ती मागत आहेत. काळ मोठा कठीण आहे. त्यामुळे राम नावाच्या नावेत बसा. भगवंत नावाडी होऊन भव सागर नक्कीच पार करून नेतील असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज ( माकोडी) यांनी केले.

रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज (श्रीक्षेत्र माकोडी ) यांच्या कृपाशीर्वादाने बुलढाणेकर भाविकांनी तीन दिवसीय नामजप शिबिराचे आयोजन केले होते. प.पू. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान विघ्नहर्ता गणेश मंदिर रामनगर येथे हे शिबिर पार पडले. यावेळी श्रीहरी महाराज म्हणाले की,
परमपूज्य सद्गुरु श्री प्रल्हाद महाराजांच्या कृपेने आपले काम सुरू आहे ते मालक हे सगळं करून घेतात. भक्तीसाठी मनाचा निग्रह पक्का असावा लागतो. “जैसे खावे अन्ना तैसे होते मन”. त्यामुळे सात्विक आहाराचे सेवन करा. कलयुगामध्ये अन्नदान आणि नामस्मरण हे पुण्यप्राप्तीचे साधन आहे. संतांच्या पुण्याईने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला महाराष्ट्र आहे. संतकृपेने ज्ञानचक्षु तुम्हाला देखील लाभू शकतात. मात्र त्यासाठी द्वेष आणि मत्सराची जळमट दूर करून पूर्ण समर्पण भावनेने भगवंताचे नामस्मरण करावे लागते.व्यवहार तापामध्ये एक नाम तेवढे श्रेष्ठ आहे. सर्व संतांनी अनुभव घेऊन सिद्ध करून ते आपल्याला दिले आहे. कशाची धास्तीच पकडायची असेल तर ती नामाची पकडा. दररोज नित्यनेमाने राम नाम घ्या, असे मार्गदर्शन समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांनी केले. २८ जानेवारी रोजी काकडा आरतीने या सोहळ्याचा श्री गणेशा झाला. दिवसभर नामजप आणि रात्री सौ. राजश्री देशपांडे (चिखली )यांचे प्रवचन झाले. सद्गुरु कृपेचे महत्व त्यांनी उलगडून सांगितले. एकादशीला प. पू. सद्गुरु श्री. प्रल्हाद महाराज (साखरखेर्डा) यांचे चरित्र पारायण साठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दुपारी श्री सुयोग गुरुदेव भजनी मंडळ ( बुलढाणा) यांनी भजन गायन सेवा दिली. यावेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. तर सायंकाळी डॉ. कल्याणीताई पद्मने (अकोला) यांनी कीर्तनातून नाममहिमा, सद्गुरु सेवा या विषयावर सखोल मांडणी केली. ३० जानेवारीला सकाळी पाच वाजता वेदशास्त्रसंपन्न प्रणव जोशी ( जालना) ह्यांनी प.पु . ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जन्मोत्सवाचे प्रवचन केले. सद्गुरु परंपरेचे दाखले देत संतांचा त्याग आणि त्यातून मानव कल्याणाचे हित कसे साधले गेले, यावर भाष्य केले. यावेळी प.पू. गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी दहा वाजता श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज (निरपूरकर) यांनी काल्याचे किर्तन केले. दुपारी भव्य महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!