क्राईम जगत
खळबळजनक: पाच दिवसांत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण तर चार तरुणी बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : गेल्या पाच दिवसांत बुलढाणा शहर, मलकापूर, काजेगाव आणि डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाच मुली बेपत्ता झाल्या. तर एका मुलीचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यात चार तरुणी स्वतःहून घरातून निघून गेल्या असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसात लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सोशल मीडियाचा अतिवापर, ओळखीच्या व्यक्तींकडून मिळणारे आमिष किंवा अन्य कारणांमुळे मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तानाजी नगर येथील रहिवासी असलेली १९ वर्षीय साक्षी दिलीप नाटेकर ही मुलगी २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून बेपत्ता आहे. साक्षी ही स्थानिक स्त्री रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात नोकरीस होती. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी ती भावासोबत रुग्णालयात गेली होती. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांकडे आणि शहरात शोध घेतला. परंतु तिचा सुगावा लागला नाही. अखेर तिचे वडील दिलीप नाथा नाटेकर यांनी ३० जानेवारी रोजी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. साक्षीचा रंग सावळा असून उंची अंदाजे ५ फूट, अंगात पांढरा टॉप आणि काळ्या रंगाची लेगीन्स घातलेली आहे. डोक्याचे केस लांब आणि बाधा सडपातळ आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे हे करीत आहेत. मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील झोडगा येथील रहिवासी असलेले गजानन वसंत वराडे यांची १९ वर्षीय मुलगी प्रांजल गजानन वराडे ही २९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कॉलेजला गेली होती. मात्र, ती परत घरी आलीच नाही. वराडे कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. या प्रकरणी ३० जानेवारी रोजी मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तिचा रंग गव्हाळ, केस काळे आणि लांब, सडपातळ बांधा, नाकावर तीळ, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाचे सँडल. सोबत काळ्या रंगाची बॅग आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील करीत आहेत. सर्वात धक्कादायक घटना डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून हिवरा साबळे येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच आरोपी वैभव तेजराव गुऱ्हाळकर याने फूस लावून पळवून नेल्याची घटना ३० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या काकांनी डोमगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत. अपहरणाच्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडितचा गोरा रंग, गोल चेहरा, सडपातळ बांधा, उंची ५ फूट असून तिने पांढऱ्या-गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तर यापूर्वी म्हणजे २८ जानेवारी रोजी जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव आणि मलकापूरच्या मुकूंद नगरातून देखील एक तरुणी बेपत्ता झालेली आहे. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे बुलढाणा जिल्हा हादरला असून तरुण मुली आणि विशेषतः अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. वरील वर्णनाच्या मुली मिळून आल्यास संबंधित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.



