
अजय टप
मलकापूर: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येणाऱ्या उत्राता येथून एक १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी अमडापूर पोलिसांत मिसिंग नोंद घेण्यात आली असून पोलिसांकडून मुलीचा कसून शोध घेण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांत तरुणी बेपत्ता होण्याची जिल्ह्यातील आठवी घटना आहे, हे विशेष!
वाढता सोशल मिडीयाचा प्रभाव आणि शिक्षणाच्या वयात डोक्यात घुसणाऱ्या नको त्या गोष्टी. प्रियकराच्या भूलथापांना बळी पडून घरादारावर आणि जन्मदात्यांवर पाणी सोडण्याची जणुकाही फॅशनच तरुणाईने अंगिकारली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बेपत्ता होण्याच्या लागोपाठ घटना घडतांना दिसत आहे. मलकापूर येथून दोन चिमुकल्यांसह विवाहित, आणि एक तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच उत्राता (ता.चिखली) येथून पुन्हा एक युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली.
भाग्यश्री अरुण सपकाळ (वय १८ वर्षे ३ महिने) ही तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. नातेवाईकांनी तिचा गाव, परिसर आणि सर्व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र, ती अद्यापर्यंत मिळून आली नाही. भाग्यश्री अरुण सपकाळ हिचे वय १८ वर्षे ३ महिने असून तिचा रंग सावळा आहे. बांधा सडपातळ असून तिने अंगात काळया रंगाचा पंजाबी टॉप आणि पिवळ्या रंगाची लेगीज, असा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. उपरोक्त युवतीबद्दल माहिती मिळाल्यास अमडापूर पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार लक्ष्मण टेकाळे हे करीत आहेत.



