
बुलढाणा,(प्रतिनिधी): धर्माविषयी चुकीची माहिती पसरवू नका, असे सांगणाऱ्या एका इमामला भरचौकात गाठून चौघांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना ३१ जानेवारीच्या रात्री धाड येथील आझाद चौकात घडली. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. समाजात शांतता आणि सलोखा राखण्याची जबाबदारी असलेल्या धार्मिक क्षेत्रातही आता गुंडशाहीने शिरकाव केल्याची प्रचिती देणारी ही घटना असल्याचे बोलल्या जात आहे.
धाड (ता.बुलढाणा) पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सातगाव म्हसला येथील रहिवासी असलेले शेख इस्माइल शेख बुढुन (वय ३३ वर्षे) हे पेशाने इमाम आहेत. त्यांना आरोपी साबीर बेग शब्बीर बेग हा धर्माविषयी चुकीची माहिती आणि प्रक्षोभक प्रवचन देत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी “तुम्ही धर्माविषयी चुकीची माहिती सांगू नका आणि लोकांची दिशाभूल होईल असे प्रवचन करू नका,” असे असा त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा सल्ला आरोपीच्या जिव्हारी लागला आणि त्यातूनच आझाद चौकात रक्ताचा खेळ रंगला. ३१ जानेवारीच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान शेख इस्माइल हे आझाद चौकात बसलेले असताना आरोपी साबीर बेग याने मोहम्मद बेग, खिचर बेग आणि अम्मार बेग, या त्याच्या तीन मुलांसह आझाद चौकात जाऊन “तुला जास्त मस्ती आली आहे का? तुला कापून टाकू,” अशा अत्यंत अश्लील आणि हिंसक भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता उपरोक्त आरोपींनी इमामवर हल्ला चढवला. तसेच भरचौकात त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्या देखील होत्या. या घटनेमुळे आझाद चौक आणि परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या संदर्भात शेख इस्माइल यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २९६ धार्मिक उपासनेत अडथळा निर्माण करत अश्लील कृत्य करणे, कलम ११५, ३५१ (२), ३५२ मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देणे, कलम ३ (५) संघटितपणे गुन्हा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करीत आहेत.
सामाजिक सलोख्यासाठी घातक
आरोपी साबीर बेग आणि त्याच्या तीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एका धार्मिक पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होणे, हे लोकशाही आणि सामाजिक सलोख्यासाठी घातक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.



