क्राईम जगत

बुलढाणा क्राइम डायरी: हाणामारी, छळ आणि आक्षेपार्ह पोस्टमुळे जिल्ह्यात १० गुन्हे दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ जानेवारी हा मोठ्या धावपळीचा ठरल्याचे दिसून आले. जिल्ह्यात अंढेरा, धाड, नांदुरा, जलंब , बुलढाणा, खामगाव यांसह विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये शेतीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेला तणाव आणि कौटुंबिक छळाच्या घटनांचा समावेश असून अशा पद्धतीचे वाढते गुन्हे शांत आणि संयमी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याची वाटचाल गुन्हेगारी जगताकडे होत असल्याचे द्योतक आहे. यावर शासन,प्रशासन आणि समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
अंढेरा: धोत्रा नंदई परिसरात नागेश मुंडे यांच्या शेतात परवानगीशिवाय कोळसा तयार करणाऱ्या मजुरांना विचारणा केली असता, दीपक बनसोडे व भारत बनसोडे यांनी त्यांना शिवीगाळ केली. “आमच्या शेतात आला तर तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा टाकू” अशी धमकी दिल्याने अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धाड: धाड पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती शेख करीम उर्फ सददाम आणि सासरच्या इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. व्यवसायासाठी माहेरून २ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी तिला मारहाण करण्यात येत होती.
नांदुरा: तालुक्यातील माळेगाव गोंड शिवारात सरकारी ‘ई-क्लास’ जमिनीच्या नांगरटीवरून दोन गटात मोठी हाणामारी झाली. प्रतीक हेलगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राजेश काळे व वासुदेव काळे हे सरकारी जमीन नांगरत असताना त्यांना हटकले असता, त्यांनी लोखंडी रॉड व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. इतकेच नव्हे तर “तुम्हाला खल्लास करतो” असे म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तर वासुदेव काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार अमोल बाठे व इतरांनी त्यांच्या जेसीबीच्या काचा फोडल्या आणि मारहाण केल्याचे म्हटले आहे.
जलंब: आक्षेपार्ह पोस्ट आणि जातीवाचक शिवीगाळ
भोटा (ता. नांदुरा) येथील भरत पारस्कर याने भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तणाव निर्माण झाला. याबद्दल विचारणा करण्यास गेलेल्या अमोल भोटकर व इतर ग्रामस्थांना आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करत आहेत.
बुलढाणा शहर: केवळ ६०० रुपयांच्या देण्याघेण्यावरून अल्लाब कुरेशी याने इस्माईल शहा यांच्यावर लोखंडी वस्तूने हल्ला करून त्यांना जखमी केले.
खामगाव शहर: घरासमोर उभे राहण्याच्या वादातून नातेवाईकांनीच एकमेकांवर विटा आणि पाईपने हल्ला केला. यात शेख भुरा यांचा भाऊ जखमी झाला आहे.
अमडापूर: “आमच्या घरासमोर बसू नका” असे म्हटल्याच्या कारणावरून निलेश व नागेश चिंचोले यांनी फिर्यादी करण धनजे यांना पाईप व काठीने मारहाण केली.
जलंब (आमसरी): भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विनोद कुटे यांच्या हातावर आरोपी महिलेने ब्लेडने वार करून त्यांना जखमी केले.
अपघाती मृत्यू: रिधोरा येथील हरीचंद्र चव्हाण या तरुणाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धामणगाव बढे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
ट्रॅफिक कारवाई: पिंपळगाव राजा येथे रस्त्याच्या मधोमध बेदरकारपणे वाहन उभे करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी टाटा एस क्रमांक एमएच-०४-एफयू-९७५३ च्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!