स्मार्ट बुलढाणा

अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा:संतोष परिहार

५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चिखलीतील जयस्तंभ चौक येथे दर्शन; खडकपूर्णा धरणात होणार विसर्जन

चिखली,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपल्या ठसठशीत नेतृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाची श्रद्धांजलीपर बुलढाणा जिल्हा परिक्रमा ३ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, ५ फेब्रुवारीपर्यंत ही परिक्रमा चालणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांना अस्थिकलश दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परिक्रमेअंतर्गत ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, जयस्तंभ चौक येथे अस्थिकलश दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे.
अस्थिकलश दर्शनानंतर दुपारी ३ वाजता संत चोखामेळा सागर अर्थात खडकपूर्णा धरण प्रकल्प येथे पवित्र अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार असून, त्यानंतर या श्रद्धांजलीपर जिल्हा परिक्रमेची सांगता होणार आहे. अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, या परिक्रमेदरम्यान त्यांच्या कार्याची आठवण काढत जनतेच्या भावना व्यक्त होणार आहेत. जिल्हाभरात शोकमय व भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

या अस्थिकलश दर्शनासाठी चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
चिखली तालुकाध्यक्ष संतोष परिहार यांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!