महाराष्ट्र माझा
ब्रेकिंग: अन् मंत्री पंकजा मुंडे बचावल्या! हेलिकॉप्टरमध्ये झाली होती तांत्रिक बिघाड
छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात धुरळा उडाला असून विविध पक्षाचे स्टार प्रचारक आपापल्या पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रत्येक जिल्हा पिंजून काढत आहेत. भाजपच्या आक्रमक आणि स्टार प्रचारक असलेल्या मंत्री पंकजा मुंडे ह्या मैदानात उतरल्या असून आज ३ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधून लातूरकडे झेपावताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीस्थित बजाजनगर येथे २ फेब्रुवारी रोजी मंत्री पंकजा मुंडे यांची झंझावाती सभा झाली. आज ३ फेब्रुवारी रोजी त्यांचा लातूर जिल्ह्याचा दौरा असल्याने त्या सकाळी लातूरकडे झेपावण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसणार इतक्यात वैमानिकाला इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे जाणवले. वैमानिकाने धोका न पत्करता तत्काळ उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या हवाई प्रवासाबाबत सध्या विशेष खबरदारी घेतली जात आहे. अशातच पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे लाट पसरली. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे लातूरच्या सभा रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, कार्यकर्त्यांची निराशा होऊ नये आणि प्रचारात खंड पडू नये, म्हणून पंकजा मुंडे यांनी माघार न घेता पर्यायी रस्ते मार्गाची व्यवस्था करून लातूरकडे प्रयाण केले.
आज घडलेल्या या घटनेमुळे नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांच्या मर्सिडीज कारचे दोन्ही टायर फुटून मोठा अपघात होताना वाचला. आता पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आल्याने, व्हीव्हीआयपी दौऱ्यांमधील तांत्रिक सुरक्षा आणि वाहनांच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अन् पंकजाताई बचावाल्या!
बजाजनगरच्या कालच्या सभेत भाषण करताना पंकजा मुंडे यांनी एक अत्यंत भावनिक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, “मी हेलिकॉप्टरने प्रवास करते हे माझ्या आईला माहीत आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा आकाशात असते, तेव्हा माझी आई घरी माझ्यासाठी देव पाण्यात ठेवते.”
आजच्या घटनेनंतर त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत असून आईच्या प्रार्थनेमुळेच आज मोठी आफत टळल्याची भावना त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे.


