क्राईम जगत
सावधान!”झिरो-क्लिक अटॅक”मुळे बँक खाते रिकामे
मोबाइलला स्पर्श न करताही पैसे आणि खाजगी डेटा गायब

बुलढाणा,(प्रतिनिधी): एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं किंवा “ओटीपी” शेअर केला तरच सायबर फसवणूक होते, असे ऐकले होते. मात्र, आता प्रगत झालेल्या हॅकिंगच्या नवीन तंत्राने काहीही न करता, कोणत्याही लिंकवर क्लिक न करताही तुमचा फोन पूर्णपणे हॅक होत आहे. हो, नव्याने आलेल्या या प्रकाराला सायबर तज्ज्ञ “झिरो-क्लिक अटॅक” म्हणत असून या पासून सावधान राहण्याचे आवाहन बुलढाणा सायबर पोलिसांनी केले आहे.
दूरवर कुठे तरी बसून गुन्हे करणारे सायबर गुन्हेगार यापूर्वी हॅकिंगसाठी युजरच्या काहीतरी कृतीवर टपून बसायचे. आता, मात्र याच हॅकर्सने “झिरो-क्लिक” नावाची ट्रिक शोधून काढली असून या अटॅकमध्ये हॅकरला आपल्या कोणत्याही मदतीची गरज उरली नसल्याचे समोर आले आहे. हे हॅकर WhatsApp, iMessage किंवा SMS द्वारे आपल्या मोबाइलमध्ये एक विशिष्ट “मालिशिअस” कोड पाठवतो. फोनच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीचा फायदा घेऊन हा कोड आपोआप “एक्झिक्युट” होतो. विशेष बाब म्हणजे हा मेसेज आल्यानंतर कोणतेच नोटिफिकेशन येत नाही, त्यामुळे तो मेसेज न उघडताही फोन हॅकरच्या ताब्यात जातो. “पेगासस”मुळे चर्चेत आलेली ही पद्धत असून हॅकर एखाद्या अॅपमधील “व्हल्नरेबिलिटी” शोधून त्याद्वारे डेटा चोरी करत आहेत. नकळत फोनचा माईक किंवा कॅमेरा सुरू करून तुमचं बोलणं ऐकणे, तुम्ही कुठे आहात, कोणाला भेटताय याची रिअल-टाइम माहिती, तुमचे फोटो, वैयक्तिक चॅट्स, बँकेचे मेसेजेस आणि महत्त्वाचे कागदपत्रेही त्यांच्या ताब्यात जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सुरुवातीला देशातील मोठे राजकारणी, पत्रकार, उद्योगपती किंवा सरकारी अधिकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता सामान्य नागरिकांचे बँक डिटेल्स चोरण्यासाठीही या तंत्राचा वापर सुरू असून ते “रॅन्समवेअर”साठी या पद्धतीचा वापर करत असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.
असा करा स्वतःचा बचाव
आपल्या मोबाइलचं OS (Android/iOS) आणि अॅप्स नेहमी अपडेट ठेवा.फोनमध्ये गरज नसलेले किंवा अनधिकृत अॅप्स त्वरित काढून टाका.प्रत्येक महत्त्वाच्या अॅपला “Two-Factor Authentication” सुरू ठेवा. ईमेलवरून आलेल्या संशयास्पद फाइल्स उघडण्यापूर्वी स्कॅन केल्यास या अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन देखील बुलढाणा सायबर पोलिसांनी केले आहे.



